बीड (रिपोर्टर) केज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मौज शिवारात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलिस अधिक्षक पंकज कुमावत यांना झाल्यानंतर त्यांनी रात्री त्या ठिकाणी छापा मारला असता बारा जुगार्यांना जुगार खेळताना पकडले. त्यांच्याकडून तब्बल 3 लाख 47 हजार 470 रूपयाचा मुद्देमाल जप्त केला. तर अन्य 38 जण फरार झाले असून या सर्वांविरोधात केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला असतानाच येथे पोलिस आहेत की नाही? असा सर्वसामान्यांना प्रश्न पडला आहे. मात्र यामध्ये मैदान गाजवतात ते सहाय्यक पोलिस अधिक्षक पंकज कुमावत . त्यांनी आतापर्यंत गुटखा माफियांसह, वाळूमाफिया, धडाकेबाज कारवाया केलेल्या आहेत. कालच माजलगावमध्ये लाखोंचा गुटखा जप्त करण्यात आला. त्यानंतर केज पोलिस ठाण्याच्या हद्दीत जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती त्यांना मिळाल्यानंतर त्यांनी दुसरे पथक केजकडे पाठवले. मौज शिवारामध्ये इंगळे वस्तीवर गणेश सुधीर खराडे हा एका रूममध्ये इसमांना एकत्रीत बसवून कल्याण, मुंबई, मिलन डे, मिलन नाईट मटका खेळवत होता. यावेळी पथकाने धाड टाकली असता तेथुन 12 जुगार्यांना त्यांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मटका जुगाराचे साहित्य, मोबाईल, रोख रक्कम असा एकूण 3 लाख 47 हजार 470 रूपयाचा मुद्देमाल जप्त केला. मटका बुकी, मटका एजंट, जागा मालक असे एकूण 50 जणांविरोधात पोलिस नाईक अनिल मंदे यांच्या फिर्यादीवरून केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील कारवाई सहाय्यक पोलिस अधिक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक मिसळे, पोलिस नाईक दिलीप गिते, पोलिस नाईक अनिल मंदे, पो.शि.महादेव बहिरवाल, बिक्कड, सिरसाट यांनी केली.