औरंगाबादला जावून येण्यासाठी द्यावा
लागणार 300 पेक्षा जास्त रुपयांचा टोल
बीड (रिपोर्टर): पेट्रोल डिझेलच्या भाववाढीच्या भडक्यानंतर आता देशभरात नॅशनल हायवेवर वाहनधारकांवर टोलधाड पडणार असून 1 एप्रिलपासून प्रत्येक टोलनाक्यावर 10 टक्क्याच्यापुढे टोलची भाववाढ होणार आहे. याचा फटका मराठवाड्यातील जनतेलाही मोठ्या प्रमाणावर बसणार असून बीड औरंगाबाद प्रवासादरम्यान प्रतिचक्कर, प्रति टोल 10 रुपयाने महागणार असल्याचे सांगण्यात येते. आता बीडवरून औरंगाबादला जावून येण्यासाठी फास्टटॅग असणार्या वाहनांना किमान 310 रुपये टोलपोटी द्यावे लागणार आहेत तर फास्टटॅग नसणार्यांना दुप्पट पैसे मोजावे लागणार आहेत.
याबाबत अधिक असे की, गेल्या आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ रोज होत आहे. इंधनाच्या दरांनी शंभरी केव्हाच पार केली आहे, अशा परिस्थितीमध्ये आता नॅशनल हायवेवरील प्रत्येक टोलवरही 10 टक्क्यापेक्षा अधिक वाढ होत असून ही दरवाढ 1 एप्रिलपासून अंमलात आणली जाणार असल्याचे सांगण्यात येते. या टोलधाडीचा मोठा फटका बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील जनतेला बसणार आहे. धुळे-सोलापूर या हायवेवर 3 ते 4 ठिकाणी टोलनाके आहेत. या टोलनाक्यावर लहान आणि मोठ्या वाहनांसाठी वेगवेगळे दर आकारण्यात आलेले आहेत. फास्टटॅग आणि फास्टटॅग नसणार्यांसाठीही वेगवेगळे दर आहेत. बीडवरून औरंगाबादला जाताना आणि येताना आज मितीला 280 रुपयेपर्यंत टोल एका कारला द्यावा लागतो. आता कार आणि लहान वाहनांसाठी एकेरी प्रवासासाठी आज मितीला 90 रुपये लागायचे आता ते 100 रुपये घेणार आहेत. तर दुहेरी प्रवासासाठी 155 रुपये द्यावे लागणार आहेत. माल वाहू वाहणांसाठी एकेरी प्रवासासाठी, 165 तर दुहेरी प्रवासासाठी 250 रुपये तर ट्रक आणि बससाठी 345 आणि 520 रुपये मोजावे लागणार आहेत. इंधनाबरोबर टोल वाढत असल्याने सर्वसामान्यांत भाववाढीविरोधात प्रचंड संताप व्यक्त होत आहे.