परळी (रिपोर्टर) शहरातील 1557 राशन कार्ड धारकांची डाटा एन्ट्री करून त्यांना त्वरित राशन वितरीत करा या मागणीसाठी परवा परळीत काँग्रेसच्या शहराध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर आंदोलन झाले. यावेळी नायब तहसीलदार यांना बेशरमचे झाड देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रकरणात महसूल प्रशासनाने आंदोलनकर्त्या काँग्रेस कार्यकर्त्यांवर शासकीय कामात अडथळा कलम 353 नुसार गुन्हा दाखल केला. त्यामुळे या कार्यकर्त्यांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी देण्यात आली असून आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना जेलची हवा खावू घालण्याचा हा प्रकार म्हणजे प्रशासनाचा बेशरमपणाच अशी संतप्त प्रतिक्रिया सर्वसामान्यांतून व्यक्त होताना दिसून येत आहे.
गेल्या दोन दिवसांपूर्वी परळी येथे नायब तहसीलदार बाबुराव रुपनर यांना येथील काँग्रेसचे शहराध्यक्ष बहादूरभाई व त्यांच्या कार्यकर्त्यांनी बेशरमीचे झाड देवून त्यांचा सत्कार केला. सदरचे सत्कारीत आंदोलन हे शहरातील 1557 राशन कार्ड धारकांच्या डाटाएन्ट्रीसाठी होते. आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांची मागणी ही सर्वसामान्यांना राशन मिळावं ही होती. त्या दृष्टीकोणातून सदरचे आंदोलन करण्यात आलेले होते. मात्र या आंदोलनाने शासकीय कामात मोठा अडथळा झाल्याचे दाखवत परळी तहसीलच्या पुरवठा विभागाने आंदोलनकर्त्यांवर कारवाई केली. पुरवठा अधिकारी कालीदास पवार यांच्या फिर्यादीवरून शहराध्यक्ष बहादूरभाई सह अन्यजणांवर कलम 353 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या प्रकरणात त्यांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यामध्ये सय्यद हनीफ सय्यद करीम, प्रकाशराव देशमुख, गणपतअप्पा कोरे, सुभाष देशमुख, शिवाजी देशमुख, शेख बद्दर, रंजीत देशमुख, सय्यद मसूद, शेख सिकंदर, सय्यद अमजद यांचा समावेश आहे. आंदोलनकर्त्यांनी केवळ नायब तहसीलदाराला बेशरमचे झाड दिले म्हणून आंदोलनकर्त्यांवर 353 चा गुन्हा दाखल करून त्यांना जेलची हवा खावू घालणार्या परळी तहसील विरूद्ध संताप व्यक्त केला जात आहे.