Tuesday, May 17, 2022
No menu items!
Homeबीड2024 च्या तयारीसाठी भाजपा, राष्ट्रवादीने ठोकले हाबुक, भाजप महाराष्ट्र पिंजणार तर राष्ट्रवादीचा...

2024 च्या तयारीसाठी भाजपा, राष्ट्रवादीने ठोकले हाबुक, भाजप महाराष्ट्र पिंजणार तर राष्ट्रवादीचा जनता दरबार


बीड/मुंबई (रिपोर्टर) राजकीय संवेदनांनी तापलेल्या वातावरणात राजकीय पक्षांचे एकीकडे कलगीतुरे सुरू असतांनाच आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने भाजपासह राष्ट्रवादीने तयारी सुरू केल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादीचे सर्वासर्वे खा.शरद पवार यांच्या आदेशावरून राष्ट्रवादीचे सर्वमंत्री मुंबईच्या राष्ट्रवादी कार्यालयात 1 ते 2 तासाचे लोकदरबार भरवून लोकांचे प्रश्‍न सोडवणार आहेत. तर दुसरीकडे भाजपाचे 12 नेते महाराष्ट्राला पिंजून काढणार आहेत. सर्वांचे लक्ष असलेल्या बीडची जबाबदारी ही भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे देण्यात आली आहे तर राष्ट्रवादीची बुलंद तोफ तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे सायं. 4 ते 6 च्या दरम्यान मुंबईत प्रदेश कार्यालयात लोक दरबार घेणार आहेत.

2024 च्या लोकसभा, विधानसभा निवडणूकीची चाहूल आत्ताच लागल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादीचे सर्वासर्वे खा.शरद पवार यांच्या आदेशावरून मुंबईतील प्रदेश कार्यालयात आता राष्ट्रवादीचे मंत्री हे लोक दरबार भरवून लोकांचे प्रश्‍न, अडीअडचणी समजून घेवून त्या सोडवणार आहेत. हा दरबार 4 एप्रिलपासून भरणार असून राष्ट्रवादीने त्याचं वेळापत्रकही घोषीत केलं आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरूवार या चार दिवसांसाठी सकाळी 10 ते 12 दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, राजेश टोपे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दरबार असेल, दुपारी 2 ते 4 जितेंद्र आव्हाड, संजय बनसोड, प्राजक्त तनपुरे, दत्तामामा भरणे, रविंद्र शिंगणे तर सायंकाळी 4 ते 6 या वेळेत बाळासाहेब पाटील, धनंजय मुंडे, अदिती तटकरे, हसन मुश्रीफ यांचा दरबार भरला जाणार आहे. येथे सर्वसामान्यांचे प्रश्‍न आणि अडीअडचणी समजून घेवून दस्तूरखूद मंत्रीच ते सोडणार आहेत.
तर दुसरीकडे भाजपानेही राज्यातील 48 लोकसभा मतदार संघ आणि 288 विधानसभा मतदार संघाची चाचपणी करण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढण्याची तयारी सुरू केली आहे. 12 मातब्बर नेत्यांवर वेगवेगळ्या जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली असून हे नेते त्या जिल्ह्यात जावून तळ ठोकत सर्वसामान्यांशी संवाद साधणार आहेत. बीडची जबाबदारी ही सुधीर मुनगंटीवार यांच्यावर देण्यात आली आहे. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसांसह अन्य नेत्यांवरही ही जबाबदारी देण्यात आली असून यामध्ये देवेंद्र फडणवीसांकडे सोलापूर, अहमदनगर हे जिल्हे देण्यात आले आहेत. बीड, जालना जिल्हा सुधीर मुनगंटीवार, ठाणे ग्रामीण नाशिक चंद्रकांत पाटील, रत्नागिरी सिंधूदुर्ग आशिश शेलार, बुलढाणा, नंदूरबार-रावसाहेब दानवे, पालघर मिराभाईंदर-प्रविण दरेकर, कोल्हापूर सांगली-पंकजा मुंडे, अकोला अमरावती-चंद्रशेखर बावणकुळे, उस्मानाबाद हिंगोली-गिरीश महाजन, सातारा पुणे ग्रामीण-रवींद्र चव्हाण, गोंदिया भंडारा-संभाजी निलंगेकर, दक्षिण रायगड उत्तर रायगड-संजय कुटे

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!