बीड (रिपोर्टर) गावच्या विकासासाठी आलेल्या निधीचा गैरवापर करत अपहार केल्याचा ठपका सिद्ध झाल्यानंतर पिंपळनेरच्या सरपंचावर गेल्या पंधरा दिवसांपुर्वी अपात्रतेची कारवाई करण्यात आली. आज पिंपळनेर येथील सदस्यांनी राजाभाऊ गवळी यांची एकमताने सरपंच म्हणून निवड केली असून आगामी दहा महिन्यांच्या कार्यकाळात पिंपळनेर ग्रामपंचायत अंतर्गत गावच्या विकासाला चालना देऊन रखडलेल्या कामांसह नवीन कामे पुर्णत्वास नेऊ, असे सरपंचासह उपस्थित सदस्यांनी म्हटले.
पिंपळनेर येथील सरपंच भारत जवळकर यांनी गेल्या साडेतीन वर्षांच्या कालखंडामध्ये चौदाव्या वित्त आयोगातून अन्य योजनांसाठी आलेल्या निधीचा पदाचा गैरवापर करून सर्रासपणे अपहार केल्याची तक्रार सुनिल पाटील यांच्यासह काही सदस्यांनी केली होती. या तक्रारीत सत्यता असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासमोर सुनावली झाल्यानंतर ही सुनावणी पुढे अप्पर आयुक्त यांच्यासमोर झाली. या ठिकाणीही भारत जवळकर यांनी तब्बल ५५ लाख रुपयांचा अपहार केल्याचा ठपका सिद्ध झाला. त्यामुळे त्यांच्यावर गेल्या पंधरा दिवसांपुर्वी अपात्रतेची कारवाई करण्यात आली. आज नवीन सरपंचाची निवड सर्व सदस्यांच्या उपस्थितीत पार पडली. या वेळी सरपंच म्हणून राजाभाऊ गवळी यांची एकमताने निवड करण्यात आली. या वेळी सुनिल पाटील, संजय नरवडे, ग्रा.पं.सदस्य आणेराव, उमेश पवार, राजाभाऊ नरवडे, राम जाधव, अशोक पटाईत, अनिल सिरसट, शेख अनिस, राम जाधव यांच्यासह अन्य सदस्य आणि नागरिक उपस्थित होते.