Wednesday, May 18, 2022
No menu items!
Homeमहाराष्ट्रमुंबईएसटीच्या संपाचा तिढा सुटला, कर्मचार्‍यांचा आझाद मैदानावर जल्लोष

एसटीच्या संपाचा तिढा सुटला, कर्मचार्‍यांचा आझाद मैदानावर जल्लोष


हायकोर्टाचे कर्मचार्‍यांना निवृत्तीवेतन, ग्रॅच्युएटी देण्याचे आदेश
मुंबई (रिपोर्टर) सिंह आणि कोकरूच्या वादात कोकरू मरु द्यायचं नाही, असं म्हणत आज हायकोर्टाने एसटी कामगारांना 22 एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचे अल्टिमेट देत सरकारने कर्मचार्‍यांना कामावर रुजू करून घेण्याचे सांगितले. त्याचबरोबर पुन्हा अशी वर्तवणूक केली जाऊ नये, अशी अट कर्मचार्‍यांना घातली. न्यायालयाच्या या निर्णयानंतर आझाद मैदानावर एसटी कर्मचार्‍यांनी जल्लोष साजरा केला. त्यामुळे आता एसटी कर्मचार्‍यांच्या संपाचा तिढा मिटण्यात जमा असून पुन्हा राज्यात तेवढ्याच ताकतीने बससेवा सुरू होण्याची शक्यता आहे. कर्मचार्‍यांना निवृत्तीवेतन, ग्रॅच्युएटीचा लाभ देण्याच्या आदेशाबरोबर अन्य काही मागण्याही मान्य केल्या आहेत. सदरचा निर्णय आज सकाळी 10 वाजता झालेल्या सुनावणीत झाला. या वेळी सरकारने मात्र ज्या कर्मचार्‍यांवर संपादरम्यान गुन्हे दाखल झाले आहे ते मागे घेणार नसल्याचे म्हटले.

गेल्या पाच महिन्यांपासून राज्यात एसटी कर्मचार्‍यांचा संप सुरू आहे. हा संप सुरू झाल्यापासून राज्यभरातली एसटी सेवा सुरुवातीचे महिने तर शंभर टक्के ठप्प होती. या प्रकरणात अखेर कोर्टाने आज सकाळी दहा वाजता झालेल्या सुनावणीत महत्वपूर्ण निर्णय घेत कर्मचार्‍यांसह सरकारला काही निर्देश दिले. मुंबई हायकोर्टाने संपकरी एसटी कर्मचार्‍यांना 22 एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्यास सांगितलं आहे. तसंच सगळ्या कर्मचार्‍यांना पुन्हा अशी कृती करणार नाही असा इशारा देऊन सेवेत सामावून घ्यावे असे आदेश एसटी महामंडळाला दिले आहेत. या कर्मचार्‍यांना निवृत्तीवेतन, ग्रॅच्युएटीचा लाभ देण्याबाबत आदेश देण्याचंही कोर्टाने स्पष्ट केलं आहे. कोर्टाने संपकरी कर्मचार्‍यांच्या शक्य त्या सर्व मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे.
ज्या कर्मचार्‍यांवर संपादम्यान गुन्हे दाखल झाले ते मागे घेणार नाही, अशी भूमिका यावेळी महामंडळाने मांडली. मात्र ते मागे घेण्याबाबत आम्ही आदेश देऊ असंही न्यायालयाने स्पष्ट केलं. आम्हाला या संपामुळे एकही मृत्यू झालेला नको आहे. सिंह आणि कोकरूच्या वादात आम्हाला कोकरूला वाचवावे लागेल असं कोर्टाने यावेळी सांगितलं.


कोर्टाने कर्मचार्‍यांना कोविडचा भत्ता देण्यासही सांगितलं असल्याची माहिती संपकरी कर्मचार्‍यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी दिली. एका कर्मचार्‍याला 300 रुपये प्रमाणे प्रत्येकी 30 हजार देण्यास सांगितलं असल्याची माहिती त्यांनी दिली. याआधी बुधवारी झालेल्या सुनावणीत सध्याच्या कसोटीच्या काळात आपले उपजीविकेचे साधन गमावू नका आणि जनतेला त्रास होऊ देऊ नका, असे आवाहन करत कोर्टाने संपकरी कर्मचार्‍यांना 15 एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याची सूचना केली होती. संपकर्‍यांना एक संधी देऊन त्यांच्यावरील कारवाईच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याबरोबरच त्यांना पुन्हा सेवेत सामावून घ्या, अशी सूचनाही कोर्टाने महामंडळाला केली होती. करोनाकाळात कर्मचार्‍यांनी संप पुकारला. या काळात प्रत्येकाला काही ना काही समस्यांना सामोरे जावे लागले आहे. संपकरी कर्मचारीही सारासार विवेकबुद्धीला पटणार नाही असे वागले. परंतु अशा कर्मचार्‍यांना एकदा संधी द्यायला हवी. त्यामुळे त्यांना परत घेण्याचा विचार करा. त्यांच्या उपजीविकेचे साधन त्यांच्यापासून हिरावून घेऊ नका, असं कोर्टाने म्हटलं होतं.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!