बीड (रिपोर्टर) खांडे पारगाव परिसरातील सात गावाना मागील तीन ते चार वर्षांपासून नियमित वीज पुरवठा होत नाही यासह सात गावांना सुरळीत विधुत पुरवठा करण्यासाठी नवीन 33 विधुत उपकेंद्र मंजूर करण्यात यावे. या आ.विनायकराव मेटे यांच्या मागणीला ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी हिरवा कंदील दाखवला व लवकरच तांत्रिक स्तरावर मान्यता घेऊन खांडे पारगाव येथे उपकेंद्र सुरू होईल अशी ग्वाही दिली.
शिवसंग्रामचे शेतकरी आघाडीचे नेते राजेंद्र आमटे यांनी सात गावातील शेतकर्यांच्या माध्यमातून चार एप्रिल रोजी महावितरण कार्यालयावर आक्रोश मोर्चा आयोजित तेलेला होता. शेतकर्यांना वेळेवर लाईट मिळत नाही , अपुरी वीज मिळते व विहिरीत पाणी असून सुद्धा शेती करता येत नाही अशा अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे म्हणून हे आंदोलन करण्यात आले होते. खांडे पारगाव , नागापूर खुर्द , उमरी, नागापूर बुद्रुक , उमरद खालसा , अंथरवणपिंप्री व अंथरवण पिंप्री तांडा या सात गावांना नाळवंडी विधुत उपकेंद्रा मधून वीज पुरवठा केला जात आहे .परंतु या उपकेंद्रावर अधिकचा लोड येत असल्याने सुरळीत वीजपुरवठा होत नाही म्हणून शिवसंग्रामच्या माध्यमातून आ.विनायकराव मेटे यांनी महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा मंत्री ना.नितीनजी राऊत यांच्याकडे अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ही मागणी लावून धरली होती .त्यांनी खांडे पारगाव परिसरामध्ये लवकरच 33 के.व्ही विद्युत उपकेंद्र होईल यासाठी आवश्यक त्या तांत्रिक बाबी पूर्ण करून शेतकर्यांची अडचण सोडवली जाईल या संदर्भात संमती दर्शवली त्यामुळे या सात गावातील शेतकर्यांचा प्रश्न शिवसंग्रामच्या माध्यमातून मार्गी लागणार आहे याचे शेतकरी बांधवा मधून समाधान व्यक्त केले जात आहे.