Tuesday, May 17, 2022
No menu items!
Homeबीड‘गुरुकुल’मध्ये शिक्षकाकडून मुलीची छेड नातेवाईकांकडून बेदम चोप

‘गुरुकुल’मध्ये शिक्षकाकडून मुलीची छेड नातेवाईकांकडून बेदम चोप


बीड (रिपोर्टर) बीड शहरातील नामांकित गुरुकुल इंग्लिश स्कूलमधील शिक्षकाने इयत्ता चौथीच्या मुलीशी छेडछाड केल्याच्या आरोपातून नातेवाईकांनी सदरील शिक्षकाला बेदम चोप दिल्याची घटना आज सकाळी गुरुकुल इंग्लिश स्कूलमध्ये घडली. घटनेची माहिती कळताच घटनास्थळी शिवाजीनगर पोलिसांनी धाव घेऊन संबंधित शिक्षकाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. दुपारी एक वाजेपर्यंत या प्रकरणात पोलिसांकडे अधिकृत तक्रार आली नव्हती. सदरचा प्रकार अत्यंत गंभीर असून शाळेत शिक्षकांकडून मुलींसोबत होणारे गैरवर्तन हे पालकांची चिंता वाढवणारी आहे.


शहरातील जालना रोड भागात नामांकित गुरुकुल इंग्लिश स्कूल आहे. या इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण घेणार्‍या इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनीची काल छेड काढल्याची घटना जेव्हा मुलीच्या पालकांसह नातेवाईकांना झाली तेव्हा आज सकाळी पालकांनी थेट इंग्लिश स्कूलमध्ये येऊन संबंधित शिक्षकाचा शोध घेत त्याला बेदम मारहाण केली. पालकांचा संताप एवढा होता की, शिक्षकाला बेदम चोप दिल्यामुळे त्याला चालताही येत नव्हते. या घटनेची माहिती शिवाजीनगर पोलिसांना झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस येईपर्यंत संबंधित शिक्षक तशाच अवस्थेत गुरुकुल इंग्लिश स्कूलच्या एका वर्गात पडून होता. पोलीस आल्यानंतर त्याला रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेचे गांभीर्य पाहून पोलिसांनी या प्रकरणात अधिक तपास करायला हवा. मात्र दुपारी एक वाजेपर्यंत मुलीच्या पालकांकडून कुठलीही तक्रार दाखल करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे पोलिसांनी संबंधित शिक्षकाला दुपारपर्यंत ताब्यात घेतले नव्हते.

Most Popular

error: Content is protected !!