Wednesday, May 18, 2022
No menu items!
Homeसंपादकीयअग्रलेख- ..तर धर्मांधतेच्या मंथरा मस्तकात वळवळणार नाहीत

अग्रलेख- ..तर धर्मांधतेच्या मंथरा मस्तकात वळवळणार नाहीत


गणेश सावंत
मो. नं. 9422742810

आम्ही सातत्याने आणि अभिमानाने सांगत आलो आहोत. भारत भाग्यशाली देश आहे. अखंड जगाला नुसता भूगोल आहे परंतु अखंड भारताला भूगोला बरोबर इतिहास आहे. त्या इतिहासाची श्रीमंती श्रीकृष्ण, श्रीराम, गौतमबद्ध, राजे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी या पाच विचाररत्न जडीत विभूतींमुळेच. या पाच विभूतींच्या काळाला आणि स्थळाला जशी मर्यादा नाही तशी अखंड हिंदुस्थानचे स्फूर्तीस्थान असलेल्या रांगड्या महाराष्ट्रातल्या महामानवांना आणि त्यांच्या विचार स्वातंत्र्यांना मर्यादा नाहीत. मग भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर असोत अथवा फुले शाहू माणसाला माणूस म्हणून जगण्याची हिम्मत आणि प्रेरणा इथेच मिळते. या सर्वांच्या अलौकिक गुणांची व अवतारतुल्य कार्याची माहिती आणि महती आजच्या तरुणाईत वस्तुनिष्ठ रुजली तर नक्कीच भाग्यशाली भारत देश सदैव वैभवशाली राहील. या महान विभूतींच्या आणि महामानवांच्या कार्याची जातीय आणि धर्मांध अफू घेऊन नशा करण्यापेक्षा त्यांच्या विचाराचे पाईक होणे म्हणजेच महामानवांसह महान विभूतींसमोर खर्‍या अर्थाने नतमस्तक होणे होय. आकाशात सूर्य असल्यावर ज्या पद्धतीने निराशाचा अंधार दूर होतो त्या प्रमाणेच या विभूतींच्या खर्‍या चरित्राचे आत्मचिंतनाने आजच्या मरगळलेल्या आणि भरकटलेल्या तरुणाईत उत्साह संचारेल, उदासीनता दूर होईल, भविष्यासाठी हिम्मत येईल यात दुमत असण्याचे कारण नाही. प्रभू रामाचे चरित्र नव्हे तर

इतिहास सांगणारे रामायण


रामायण भारतीय जनतेचा प्राण आहे. राम रामायणाचा प्राण आहे. राम मर्यादा पुरुषोत्तम आहे रामायणात काय नाही ? त्यागाची मूर्ती राम आहे, सहन करणारी सीता आहे. लढणारी सीता आहे. सुख आहे, दुःख आहे , मित्र आहे, दगाफटका आहे, युद्ध आहे, सरशी आहे, पिछेहाट आहे, अमृत आहे, विष आहे, हनुमानाच्या रूपात स्वामिभक्ती आहे. याउलट रावणाचा सख्खा भाऊ बिभीषण रामाला मिळाला. बिभीषणामुळे रामाचा विजय सुकर झाला. म्हणून म्हणतात की, घर का भेदी लंका दाहे. रामायण हे संपूर्ण विचारस्वातंत्र्य आहे. रामावर खुद्द रामायणातच वालीची रोखठोक टीका आहे. संतप्त सीतेची तीक्ष्ण व तीव्र टीका आहे. लक्ष्मण इतका प्रक्षुब्ध होतो की, आपल्या पित्याला दशरथाला ’कामलंपट म्हातारा ’ म्हणतो. ‘त्याला तत्काळ राजेपदावरून पदच्युत करूया’ असे रामाला सांगतो . रामायणाने हिंदू धर्मातील विचारस्वातंत्र्याचा पाया रचला . निसर्गात दिवसामागून रात्र आणि रात्रीच्या गर्भात दुसर्‍या दिवसाचा उष:काल असतो, त्याचप्रमाणे रामायणात सुखदुःखाचे प्रसंग एकामागोमाग स्वाभाविक घडत जातात. राम किमान दोनदा ’मला जगायचे नाही’ असे संपूर्ण निराशेने म्हणतो, तेव्हा तो माणसाच्या हृदयाची तारच छेडतो. सीता उद्गारते की, माझा देह दु : खासाठीच निर्माण केला काय ? सर्वच काही इतके स्वाभाविक की, प्रत्येक गोष्ट घडलीच असली पाहिजे, असे खात्रीपूर्वक वाटते. राम हा रामायणाचा नायक आहे याबद्दल प्रश्नच नाही. ज्याच्यामुळे व ज्याच्याभोवती कथा फिरते तो नायक (हिरो) असा नाट्यशास्त्राचा दंडक आहे. कथा रामाभोवती फिरते, म्हणून तर रामायण म्हणतात. सीता म्हणजे शोकरस व लाव्हारस तथापि राम हा एकमेव नायक नाही. रामायण सीतेभोवतीही फिरते. तेव्हा सीतासुद्धा या अर्थाने ’ नायक ’ आहे . सीता तेजस्वी, तपस्वी व यशस्वी आहे . सीता रामायणातील भावना आहे . स्त्री जन्माची कहाणी आहे, पण सीता वेगळी स्त्री आहे. सीता फक्त रडत बसणारी नाही. सीता आव्हान आहे. ती खुद्द रामाला त्याच्या अशोभनीय वर्तनाचा जाब विचारणारी विद्युतल्लता आहे. लाव्हारस आहे. परिस्थितीला वाकविणारा निर्धार आहे. लक्ष्मण नायक आहे आणि हनुमानाविना तर रामायण पूर्णत्वाला गेलेच नसते. असे छातीठोक पणे नीलकंठ खाडिलकर सांगतात. रामायण हा संस्कारीक नियम नाही तर आदर्श पती, पुत्र, भाऊ, पत्नी, स्वामीभक्त कसे असतात याच ज्वलंत जळजळीत उदाहरण आहे. रामायण जीवनाचा आणि जीवनमान उंचवण्याचा सार तेव्हाच असेल जेंव्हा रामा इतका त्यागाला तुम्ही आम्ही महत्व देऊ. अखंड रामायणाची कथा जशी आपल्याला आपल्याच घराभावतीच फिरते असे वाटते तेव्हां
प्रभू राम हिमालया
एवढे उंच

दिसतात आणि तुम्ही आम्ही त्यांच्या नखातले मळही नसल्याची अनुभूती का येते याचा साधा विचारही करत नाहीत. याचे कारणच आम्ही या विभूतींना मुळातून समजूनच घेतले की नाही या प्रश्नांत सामावते. अखंड रामायणातली खलनायिका मंथरेच्या कानफुकीने विषारी झालेली कैकयी जेंव्हा राजा दशरथाकडून भरताला राजा करण्याचा शब्द घेते आणि थेट प्रभू रामाला वनवासात पाठवण्याचा आदेश दे म्हणते तेव्हाचा प्रसंग आठवला तर राम प्रभू कसे झाले याचे उत्तर मिळते. प्रभू रामाचा उद्या राज्याभिषेक होणार होता. आदल्या रात्री कैकईने अक्षरश: रातोरात राज्यक्रांती घडवली होती. रामाला राज्य होण्यापुर्वीच पदच्यूत केले होते. तिचा पुत्र भरत अयोध्येचा राजा होणार होता. राम-सीतेला काहीच पत्ता नव्हता. दशरथाचे राज्याभिषेकासाठी बोलावणे येताच जाण्यासाठी ते तयार होते, तेवढ्यात सुमंत रामाकडे आला, गांगारत, चाचरत म्हणाला, रामा, दशरथ राजा व कैकई मातेने तुला महालात बोलावले आहे. प्रभू राम कैकईच्या महालात आले, दशरथ राजा हुंदका देत खाली पडले होते. कैकईने रामाला सर्व हकीकत सांगितली होती. दशरथाने निष्ठूर आवाजात ‘चौदा वर्षे वनवासाला जा’, अशी रामाला आज्ञा दिली. तो क्षण रामाच्या चेहर्‍यावर यतकिन्चितही नाराजी नव्हती. राम प्रसन्न मुद्रेने हसले आणि आणि आई-वडिलांच्या आदेशाचे पालन करण्याची संधी भेटल्याचा आनंद घेत ते उद्गारले ‘तुम्ही मला नुसतं सांगितलंही असतं तरी अडचण नव्हती, जंगलात ऋषी-मुनींच्या सानिध्यात राहण्याचं भाग्य मला मिळेल,असे जेव्हा राम सांगतो आणि रायमायणातून तुम्ही-आम्ही ऐकतो तेव्हा रामाचा त्याग दिसून येतो. याउलट
प्रभू रामाचे ठेकेदार
आज जेव्हा प्रभू रामाचे अनन्यसाधारण महत्व पटवून देण्याहेतू देशात जे काही कार्य करत आहेत, ते खरच प्रभू रामाच्या आचरणाला साजणारे आहे का? प्रभू रामांचं चरित्र असलेल्या आणि जगाने त्याकडे इतिहास म्हणून पाहिलेल्या रामायणात जेंव्हा आपण डोकावून पाहतो तेव्हा प्रभू रामाचा त्याग डोळ्यासमोर येतो. प्रभू रामाचे वर्तन, कार्य, किर्ती समोर येते. ज्या माणसाने घरात मोठा असताना केवळ आईच्या सांगण्यावरून आणि बापाच्या आदेशावरून राजगादी सोडली त्याच प्रभू रामाचे नाव घेणारे आज सत्ता सोडायची तर सोहा दुसर्‍याची सत्ता हिसकावण्याचा जेव्हा प्रयत्न करतात तेव्हा खरेच यांना राम कळलेत का? हा सवाल उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. रामायणातून काय शिकावं, प्रभू रामाच्या चरणी नतमस्तक का व्हावं हे एकदा वाल्मिकी रामायण वाचल्यावर लक्षात येईल. राम हा शब्द चिथावणीचा नाही, धर्मांध नाही, परंतु त्याच शब्दाला चिथावणी आणि धर्मांध करण्याचा जो प्रयास प्रभू रामाचे ठेकेदार करतात तेव्हा त्यांना रामायण वाचण्याचा सल्ला द्यावासा वाटतो. रामायणात काय नाही, रामायणात सर्वच काही आहे. राम आणि त्यांचे विचार जेवढे निखळ आणि शीतल आहेत तेच विचार आज अंगीकारण्याची गरज आहे. याउलट जयश्रीराम म्हणून जो धर्मांध आवेष आणला जातो तो प्रभू रामालाही मान्य नसेल. आजच्या तरुणाईने खरंतर
लव-कुषााची भूमिका
बजवायला हवी. रामाचं उभं आयुष्य ज्या संसारीक प्रारब्धाच्या खडतर रस्त्यावरून गेलं आणि त्या खडतर रस्त्यावर सीतामाईला जो त्रास झाला त्या त्रासाचा जाब लव-कुषांनीच विचारला. तो सत्य होता, सत्य-असत्याशी मन केले ग्वाही मानलिय नाही बहुमता’ हा सिद्धांत जेव्हा तुम्ही-आम्ही बाळगू तेव्हा दुधातचं दूध आणि पाण्याचं पाणी होत राहील. रामायण आणि प्रभू राम हा इतिहासाचा स्वर्ण खजिना म्हणून, विचाराचा आणि वैचारिकतेचा दस्तऐवज म्हणून आजच्या तरुणाईने आपल्या सोबत ठेवला तर नक्कीच धर्मांधतेच्या मंथरा मस्तकात वळवळ करणार नाहीत.

Most Popular

error: Content is protected !!