बीड (रिपोर्टर) सामाजिक न्याय विभागाच्या वतीने बीड जिल्ह्यात असलेल्या तृतीयपंथीयांना त्यांचे जगणे सुसह्य व्हावे म्हणून सर्वेक्षण करून त्यांना ओळखपत्र, राशनकार्ड आणि जातप्रमाणपत्र देण्यासाठी आज जिल्हाधिकारी यांनी विशेष कार्यशाळेचे आयोजन केले आहे.
बीड जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात तृतीयपंथी आहेत. अनेक तृतीयपंथी हे भिक्षा मागून आपली उपजिविका भागवितात. काही तृतीयपंथीयांकडे आधारकार्ड आहेत मात्र अनेकांनी आधारकार्ड काढूनही घेतले नाहीत. त्यामुळे सर्वच तृतीयपंथीयांचे आधारकार्ड काढणे सामाजिक न्याय विभागाच्या वतीने त्यांना विशेष ओळखपत्र देणे, राशनकार्ड उपलब्द करून देणे, तृतीयपंथी ज्या जातीचे आहेत त्याची माहिती घेणे, शिक्षणातील त्यांचे प्रमाण किती आहे हे तपासणे या सर्व बाबींसाठी आज प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे आणि सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त डॉ. सचिन मढावी यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नियोजन भवनच्या सभागृहात विशेष सभा आयोजीत केली आहे. या कार्यशाळेत त्यांना या सर्व बाबींची माहिती देऊन त्यांच्या अडचणीही समजून घेण्याचा उद्देश आहे. ही सर्व माहिती सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अद्यावत करण्यात येत आहे. डॉ. सचिन मढावी यांच्या सोबत सेवाभावी संस्थेचे प्रतिनिधी तत्वशील कांबळे हेही या कार्यशाळेत सहभागी झाले आहेत.