Wednesday, May 18, 2022
No menu items!
Homeसंपादकीयशेतकर्‍यांचे साहेब

शेतकर्‍यांचे साहेब

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शेतकरी, कष्टकरी यांच्या हितासाठी स्वतंत्र मजुर पक्षाची स्थापना 1936 साली केली. या पक्षाविषयी आपली भुमिका मांडतांना डॉ. आंबेडकर मुंबई येथील भाषणात 27 फेब्रुवारी 1937 साली म्हणतात की, मी आपल्या सार्वजनिक आयुष्यक्रमाची सुरुवात केल्यापासून ते अगदी गेल्या वर्षापर्यंत अस्पृश्य वर्गाच्या चळवळी पर्यंत कार्य करत होतो. परंतू बदलेल्या परस्थितीला अनुसरुन मी आपल्या कामाची दिशा बदलली आणि यापुढे धर्म आणि जात याचा कसलाही विचार न करता सर्व शेतकरी, कष्टकरी वर्गाच्या हितासाठी कार्य करण्याकरीता सुरुवात केली. मी स्थापन केलेला मजुर पक्ष हाच माझ्या बदललेल्या कार्यक्रमाचा एक भाग आहे.

खोती पध्दतीला मुठमाती चिपळून येथे 14 एप्रिल 1929 रोजी आयोजित शेतकरी परिषदेत बोलतांना डॉ. बाबासाहेब म्हणाले की, माझा जन्म जनतेची जबाबदारी घेण्यासाठीच झाला असावा, मी देखील मजुर वर्गापैकी एक असून इंप्रुव्हमेंट ट्रस्टच्या चाळीत राहतो. इतर बॅरिस्टरप्रमाणे मला देखील बंगल्यातून राहता आले असते पण माझ्या शेतकरी व अस्पृश्य बंधूकरीता चाळीत राहूनच काम केले पाहिजे. या बाबत मला काहीच वाईट वाटत नाही. शेतकरी वर्ग आज खोती पध्दतीमुळे गुलामगिरीत खितपत पडला आहे. सत्तेचा दुरुपयोग ही न्यायनीती आहे असे कसे म्हणता येईल. ब्रिटीश राज्यात चाललेली गुलामगिरी सरकारला नालायक ठरवित आहे. अन्यायाच्या चौकटीवर कोणताही समाज स्वास्थ्य होणार नाही. शांतता टिकवायची असेल तर सरकारने न्याय दिला पाहिजे. न्यायी सरकारने इतके दिवस खोती पध्दत चालू ठेवली ही गोष्ट अन्यायाची आहे. सरकारी रानावर खोतांनी हक्कांचा अंमल गाजवावा आणि कुळांना जुलूमाखाली नाहक छळावे हे काय गौडबंगाल आहे हेच कळत नाही. सारासार विचार करता खोतीची पध्दत मुळासकट सदोष आहे. कुणबी लोकांनी आपल्या स्वाभीमानाला जागून वरीष्ठ लोकांची हलकीसलकी कामे करुन स्वत:चा सामाजिक दर्जा मुळीच कमी करुन घेवू नये. खोतीपध्दत ही गुलामगिरी आहे. ह्या पध्दतीमुळे शेतकरी वर्ग सर्वस्वी खोताचा ताबेदार झाला आहे. ही पध्दत नाहीसी करावी अशी मागणी त्यांनी या परिषदेत केली होती.

औद्योगिकरणाची मोहिमभारत हा कृषी प्रधान देश आहे. त्यामुळे त्याने आपली संपुर्ण शक्ती कृषीच्या विकासात लावावी. भारत देश अन्य काहीही उत्पन्न न करता फक्त अन्न धान्य उत्पादनातच गर्क असतो. तो लोकांची भुक भागवेल इतके सुध्दा अन्नाचे उत्पादन करु शकत नाही, असे घडण्याचे कारण काय? भारताला पुर्णंता शेतीवरच अवलंबून ठेवणे हेच ते कारण होय. दशकानूदशके भारताची लोकसंख्या वाढते आहे. लोकसंख्येच्या वाढीच्या तुलनेत शेतीकरीता फक्त मर्यादित जमीनच उपलब्ध आहे. इतकेच नव्हे तर अशी मर्यादित जमीन जिची उत्पादन क्षमता दिवसेदिवस कमी होत आहे. भारत हा चिमटीच्या अशा दोन टोकात सापडला आहे. ज्याची एक बाजुही जनसंख्येची सतत होणारी वाढ आहे तर दुसरी बाजू जमीनीची सतत वाढणारी धुप आहे. प्रत्येक दशकात लोकसंख्या आणि उत्पादन यांचे असंतुलन धोक्याच्या मर्यादेपर्यंत वाढते आहे. दारिद्रयाचा वारसा मिळालेला भारत अधिक दरिद्री आणि दीर्घकालीन दारिद्रयाच्या विळख्यात जातो आहे. आतमध्ये कीड लागलेली आहे. औद्योगिकरणाची धडक मोहिम राबविल्याशिवाय भारतातील शेती ही फायदेशीर ठरण्याची कोणतीही शक्यता नाही. शेतीशिवाय औद्योगिकरण हेच असे एक क्षेत्र आहे जे कृषीवर अत्याधुनिक भार असलेल्या अतिरिक्त जनसंख्येला लाभदायक रोजगार देऊ शकते.

शेतकरी, कामगारांचे राज्य स्थापणार नाशिक येथे 16 जानेवारी 1949 राजी सभेत बोलतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, आपणच खरा समाजवाद प्रस्थापित करु शकू. शेतकरी, कामकरी राज्य आपणच स्थापणार. कारण आपल्यात श्रीमंत व मध्यमवर्ग नाहीतच. आपण सर्वच कामगार, आपण सर्वच गरीब, आम्हीच लोकशाही निर्माण करु. इतकेच काय कम्युनिस्टांचा कम्युनिझम राजकारणात आमच्या मागेच, आमचा पक्ष तात्विक सिध्दीत मागे पडेल असे कधीच संभवत नाही. पुष्कळ पक्ष निघाले. त्या सर्वाना आमचा हेवा वाटतो. काँग्रेस पक्ष वगळ्ल्यास हिंदमध्ये शेड्युल्ड कास्टस फेडरेशनसारखा दुसरा पक्ष नाही. सर्वाचे डोळे आमच्या पक्षाकडे लागून राहिले. आपला पक्ष हा गुळाच्या ढेपेप्रमाणे असून इतर पक्ष हे मुंगळ्याप्रमाणे आहे. आमच्या पक्षाच्या सहकार्यासाठी हे इतर आमच्या पक्षाला मुंगळ्यासारखे चिकटायला पाहतात. त्यांच्याविषयी आपण अत्यंत जागरुक असले पाहिजे. आपल्या लोकांची नितीमत्ता सोज्वळ असावी. अस्पृश्यांचे भवितव्य अतिशय उज्जवल आहे. याविषयी खात्री बाळगा. काँग्रेस म्हणते की परकीय सत्तेला हाकलून देऊन आम्ही क्रांती केली. त्याबद्दल त्यांना धन्यवाद, परंतू ही अर्धवट क्रांती आहे. खरी लोकशाही निर्माण करावयाची असल्यास आज हजारो वर्ष डोक्यावर नाचत असलेला वरचा वर्ग खाली व समाजातील खालचा वर्ग वर गेल्याशिवाय खरी क्रांती होणार नाही. क्रांतीचे चक्र अर्धेच फिरले. चाक पुर्ण फिरल्याशिवाय खरी क्रांतीच होऊ शकत नाही. #अस्पृश्यांनी पडीक जमिनी ताब्यात घ्यावी अस्पृश्यांचा पदोपदी मानभंग होतो. जेथे त्यांना अपमानाचे जीवन जगावे लागते ते गाव काय कामाचे? खेडेगावातील या अस्पृश्यानी तिथून निघून जेथे कोठे पडीक जमीन असेल ती ताब्यात घेऊन त्यावर मालकी दाखवावी. जर कोणी जमीन ताब्यात घेताना अडवले तर त्यांना स्पष्ट सांगावे की, आम्ही जमीन सोडणार नाही. परंतू योग्य तो शेतसारा सरकारला द्यावयाला तयार आहोत आणि नवीन गावे बसवून स्वाभीमानपुर्वक माणुसकीचे जीवन जगावे. तेथे नवा समाज निर्माण करावा. तेथील सर्व कामे त्यांनीच करावी. अशा गावातून त्यांना कोणी अस्पृश्य म्हणुन अपमास्पद वागणूक देणार नाही. आपल्या दरिद्री व अज्ञानी बांधवांची सेवा करणे हे सुशिक्षितांचे पहिले कर्तव्य आहे. बड्या हुद्याच्या जागी गेल्यावर सुशिक्षीतांना आपल्या अशिक्षित बांधवाचा विसर पडतो. याचे कारण त्यांच्यात स्वत:च्या समाजाविषयी आपुलकीची भावना नाही. त्याच्या ठिकाणी आपल्या बांधवाबद्दल कळकळ व तळमळ नाही, हे होय. भावनेचा अभाव हेही एक कारण आहे. जर त्यांनी आपल्या या असंख्य बांधवाकडे योग्य लक्ष दिले नाही तर समाजाचा र्‍हास हाईल. असे 18 मार्च 1956 साली आग्रा येथे बोलतांना बाबासाहेब यांनी म्हटले होते.

मोर्चा काढून या केल्या होत्या मागण्या डॉ. बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली 10 जानेवारी 1938 साली मुंबईमध्ये मोर्चा निघाला होता. या मोर्चात कोकण, सातारा, नाशिक या भागातील शेतकरी सहभागी झाले होते. यात काही मागण्या करण्यात आल्या होत्या. 1) शेतकरी वर्गाला स्वतंत्रपणे व सुखासमाधानाने राहता यावे म्हणुन जमिनीची प्रत्यक्ष मशागत करण्यालाच त्यांच्या मेहनतीचे फळ मिळाले पाहिेजे, 2) जमीनीची मशागत करुन त्यावर जगणार्‍या शेतकर्‍यांना न्याय द्यायचा असेल व त्यांच्या आर्थिक हिताची व्यवस्था व्हायची असेल तर खोत इनामदारासारखे मध्यस्थ नसले पाहिजे. 3) जमीन कसणार्‍या शेतकर्‍यांवर कर अगर पट्टी बसविण्यापुर्वी त्याला चरितार्थापुरती योग्य ती सोय करुन देणे हे सरकारने आपले कर्तव्य मानले पाहिजे, त्याप्रमाणे शेतकर्‍यांना किमान मजुरी देण्याची कायद्याने सोय करुन त्याच्या हिताला जपणे, हेही लोकमतवादी सरकारचे कर्तव्य आहे. कर्जमाफी आणि शेतकर्‍यांना किमान जमीन मिळावी, कसता येण्याजोगी सर्व पडीक जमीन उपरी शेतमजुरांना वाटून द्यावी, अशा मागण्या करण्यात आल्या होत्या.

शेतकरी देशाचा सत्ताधारी व्हावा देवरुख येथे शेतकर्‍यांच्या सभेला मार्गदर्शन करतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर 15 मे 1938 साली म्हणाले होते की, आपला उद्देश खोती बिल पास करणे व शेतकरी वर्गाची गरीब परस्थिती सुधारणे हा आहे. शेतकर्‍यांनी आपला सनदशीर लढा लढावा व तो लढत असताना सर्व बाजुनी शेतकर्‍यांनी आपली संघटना करावी. काँग्रेसने जर खोती बिल नामूंजर केले तर पुढे सत्याग्रहरुपी मोहिमेस शेतकर्‍यांनी सज्ज असावे. कुणबी वर्गाने याहीपेक्षा मोठया संख्येने स्वतंत्र मजुर पक्षाला येऊन मिळावे. कारण हाच पक्ष गरीब, कामकरी, शेतकरी वर्गाचे तिह साधणारा आहे. उलट काँग्रेस ही सावकार, खोत व पांढरपेशी यांची आहे. कारण ती त्यांच्या पैशावर जगत आहे म्हणुन तिच्या मार्फत शेतकर्‍यांचे भले होईल. अशी अशा शेतकर्‍यांनी बिलकुल बाळगू नये. तेव्हा सर्व जाती,पंथ, भेद दुर करुन सर्व शेतकर्‍यांनी हा लढा जोराने व संघटितपणे लढावा. आपला हा लढा खर्‍या अर्थाने तत्वाचा आहे. हिंदी राजकीय सत्ता शेठजी, भटजी, सावकार जमीनदार, भांडवलदारांच्या काँग्रेसच्या हाती जाण्यापेक्षा खर्‍या श्रमजिवी वर्गाच्या हाती गेली पाहिजे. बहुसंख्याक असा शेतकरी व कष्टकरी वर्ग या देशाचा खरा सत्ताधारी वर्ग बनला पाहिजे अशी अपेक्षा बाबासाहेबांनी व्यक्त केली होती.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!