गेवराई : पारा 40 अंश सेल्सियसच्या वर जात असून उष्णतेमुळे नागरिकांच्या जीवाची लाही लाही होत आहे. यातच महावतरणने 9 तास भारनियमन केल्याने प्रचंड उकाडा होत आहे. त्यामुळे नागरिक वैतागले असून हे भारनियमन बंद करावे, यासाठी गेवराईकरांनी धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अर्धा तास रस्ता रोको करत आपला संताप व्यक्त करत भारनियमन बंद करण्याची मागणी केली. महावितरणच्या अधिकार्यांसह पोलीस आणि नायब तहसीलदारांनी मध्यस्थी करून आंदोलकांना शांत केले.
एप्रिलच्या सुरुवातीपासूनच पारा वाढत चालला आहे. 40 अंश सेल्यिससच्या वर पारा जात असल्याने नागरिकांच्या जीवाची लाही लाही होत आहे. घरात फॅन, कुलर, एसी असतानाही भारनियमनामुळे ते लावता येत नाही. त्यामुळे प्रचंड उकाडा निर्माण होत आहे. यामुळे भारनियमन बंद करावे, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून होत आहे. मात्र कोळसा, कमी असल्याने भारनियमन रोखता येणार नाही, आी माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे. सकाळी संतप्त गेवराईकरांनी अचानक धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गेवरई बायपास, छत्रपती संभाजी महाराज चौकात रस्ता अडवला. तब्बल अर्धा तास गेवराईकर रस्त्यावर बसले होते. आंदोलनस्थळी गेवराईचे पोलीस, महावितरणचे कर्मचारी आणि नायब तहसीलदारांनी भेट घेऊन वरिष्ठांना बोलून काही तोडगा काढू, असे आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. अर्धा तास राष्ट्रीय महामार्ग रोखल्याने दोन्ही बाजुने वाहतुक कोंडी निर्माण झाली होती. काही काळानंतर पोलिसांनी ही वाहतूक सुरळीत केली.