मुंबई (रिपोर्टर) गेल्या दोन वर्षांत करोनाच्या संकटानंतर यंदा प्रथमच आषाढीचा पायी वारी सोहळा होणार आहे. दोन वर्षे आषाढीला एसटी बसने संतांच्या पादुका पंढरपुरात नेल्या जात होत्या. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आषाढी पायी वारीसाठी 21 जून रोजी आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवेल.
यंदा सोहळ्यात तिथीची वृध्दी झाल्याने लोणंदमध्ये अडीच दिवस, तर फलटणमध्ये दोन दिवस पालखी सोहळा मुक्कामी राहील. दिंडीकर्यांच्या मागणीनुसार यंदापासून संस्थानच्या सही-शिक्क्याने वाहन पास दिले जातील, अशी माहिती श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख ड. विकास ढगे-पाटील यांनी दिली.श्रीक्षेत्र पंढरपूर येथील संत ज्ञानेश्वर महाराज मठात आषाढी वारी पायी दिंडी पालखी सोहळा नियोजनाची बैठक पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस श्रीमंत उर्जितसिंह शितोळे, प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्त डॉ अभय टिळक, नामदेव महाराज वासकर, राणू महाराज वासकर, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे विश्वस्थ माउली जळगावकर, दिंडी समाजाचे अध्यक्ष भाऊ महाराज गोसावी, सचिव मारुती कोकाटे, बाळासाहेब रंदवे, भागवत चवरे, भाऊ फुरसुंगीकर, सोपानकाका टेंबुकर, गुरुजीबुवा राशिनकर, शरद गायकवाड, बाळासाहेब उकळीकर, व्यवस्थापक माउली वीर, सह व्यवस्थापक श्रीधर सरनाईक यांच्यासह दिंडी प्रमुख व फडकरी उपस्थित होते.