Tuesday, May 17, 2022
No menu items!
Homeबीडगेवराईलोडशेडींगचे संकट ही आघाडी सरकारची निष्क्रियता - आ. पवार

लोडशेडींगचे संकट ही आघाडी सरकारची निष्क्रियता – आ. पवार


निषेध व्यक्त करत कार्यकर्त्यांसह महावितरणला दिले निवेदन
गेवराई (रिपोर्टर) संपूर्ण महाराष्ट्रावर लादलेले लोडशेडिंगचे संकट हे राज्यातील आघाडी सरकारच्या निष्क्रियतेचे उत्तम उदाहरण आसल्याचे आमदार लक्ष्मण पवार यांनी सांगितले. त्यांनी आज लोडशेडिंगच्या विरोधात आक्रमक भुमिका घेत ही लोडशेडिंग तात्काळ बंद करा असे निवेदन उप कार्यकारी अभियंता यांना देऊन ठाकरे सरकारच्या विरोधात निषेध व्यक्त केला.


यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, पवित्र रमजानच्या महिन्यामध्ये प्रचंड उन्हाची दाहकता वाढलेली असताना वीज वितरण कंपनीने सुरू केलेल्या लोडशेडिंग मुळे नागरिकांचे अतोनात हाल होऊ लागले आहेत. तसेच या महिन्यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्याची वाट निश्चित करण्यासाठी विविध परीक्षांना सामोरे जायचे आहे. ज्यामध्ये शालेय, महाविद्यालयीन परिक्षांबरोबरच मेडिकल प्रवेश पूर्व परीक्षा, इंजिनिअरिंग प्रवेश पूर्व परीक्षा,इतर व्यावसायिक शिक्षन घेण्यासाठीच्या पूर्व परीक्षा आणि विविध स्पर्धा परीक्षा असा परीक्षेचा काळ असताना सुरू केलेली ही लोडशेडिंग परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम करणारी असल्याचेही आमदार पवार म्हणाले. या लोडशेडिंगमुळे शेतकरी,व्यापारी,विद्यार्थी आणि सामान्य माणूस या प्रत्येकाचेच हाल होताना पाहायला मिळत आहेत. उन्हाळ्याचे दिवस येताहेत त्यामध्ये पवित्र रमजान,भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती,क्रांतिसूर्य महात्मा फुले जयंती, रामनवमी,हनुमान जयंती व परीक्षेचा काळ या काळात लोडशेडिंगचे संकट निर्माण होऊ नये म्हणून राज्यसरकारने आगोदरच नियोजन करणे आवश्यक होते. परंतु सरकारचे नागरिकांच्या समस्यांपेक्षा आपले सरकार पाच वर्षे कार्यकाळ कसा पूर्ण करेल याकडे लक्ष आहे. वीज वितरण कंपनीने शेतकर्‍यांकडून, घरगुती ग्राहकांकडून वीज बिलाच्या माध्यमातून गोळा केलेला प्रचंड पैसा वीज ग्राहकांना सुविधा उपलब्ध करून देण्या ऐवजी आघाडी सरकारने आपलीच वसुली आहे असे समजून खिशात घातला की काय अशी शंका निर्माण झाली असल्याचेही आमदार पवार म्हणाले. मागील काळात फडणवीस सरकारने भारनियमन (लोडशेडिंग) मुक्त केलेल्या महाराष्ट्राला या निष्क्रिय आघाडी सरकारने लोडशेडिंग युक्त बनवले आहे. या ठाकरे सरकारचा आम्ही निषेध करतो. लोडशेडिंग बंद नाही झाली तर लवकरच जिल्हा स्तरावर माननीय पंकजाताई मुंडे यांच्याशी चर्चा करून व्यापक आंदोलन केले जाईल असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष प्रकाश सुरवसे, युवा नेते शिवराज पवार, महेश दाभाडे, राजेंद्र राक्षसभुवनकर, जेडी शहा, नगरसेवक भगवान घुंबारडे, दादासाहेब गिरी, याहीया खान, प्रा.शाम कुंड, सचिन मोटे, बंडू बारगजे, नगरसेवक जानमोहमद बागवान, बाळासाहेब गायकवाड, विठ्ठल मोटे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!