142 ठेवीदारांचे बँकेत 7 कोटी 53 लाख रुपये अडकले
बीड (रिपोर्टर): परळी शहरातील राजस्थानी को.ऑप. क्रेडीट सोसायटीमध्ये अनेक ठेवीदारांनी गुंतवणूक केलेली होती. या ठेवीदारांची बँकेने फसवणूक केली. बँकेचे चेअरमन गेल्या काही दिवसांपासून फरार आहेत. खातेदारांना त्यांचे पैसेही मिळत नसल्याने खातेदार संतापले. रात्री ठेवीदारांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला होता. जोपर्यंत दोषींविरोधात कारवाई केली जात नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर अखेर पहाटे पोलिसांनी चेअरमनसह 17 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
शहरातील 142 ठेवीदारांचे राजस्थानी को.ऑप. क्रेडीट सोसायटीमध्ये 7 कोटी 53 लाख रुपये अडकलेले आहेत. बँक तोट्यात आल्यापासून बँकेचे चेअरमन फरार झाले. पैशासाठी ठेवीदार दररोज बँकेच्या दारात जाऊन बसतात मात्र त्यांना पैसे मिळत नाहीत. अनेक ठेवीदारांच्या विविध अडचण असल्याने त्यांना पैशाची गरज आहे. काल बँकेच्या संचालक मंडळाविरोधात कारवाई करावी, यासाठी पोलीस ठाण्यासमोर ठेवीदार ठिय्या मांडून बसले होते. पहाटेपर्यंत ठेवीदार ठाण्यासमोरून उठले नसल्याने शेवटी पोलिसांनी संचालक मंडळावर गुन्हे दाखल केले. चंदूलाल बियाणींसह 17 संचालक व अधिकार्यांवर गुन्हा दाखल केला. यामध्ये चेअरमन चंदुलाल बियाणी, संचालक बालचंद्र लोढा, अभिषेक चंदुलाल बियाणी,बद्रीनारायण बाहेती, प्रल्हाद अग्रवाल ,विजय लड्डा,अशोक जाजू ,सतीश सारडा ,प्रेमलता बाहेती, कल्पना बियाणी, नामदेव रोडे,जगदीश बियाणी, अधिकारी व्ही बी कुलकर्णी, तुषार गायकवाड, प्रदीप मुरकुटे, राजेश मोदानी यांचा सहभाग आहे. दरम्यान, ठेवीदारांच्या एकजुटीमुळे संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठेवीदारांनी पोलीस निरीक्षक राजकुमार ससाणे यांची तीन दिवसांपूर्वी भेट घेतली होती. त्यानंतर रात्री पुन्हा ठेवीदार एकत्र आले, सर्वांनी पोलीस निरीक्षक लोकरे, राजकुमार ससाणे यांची भेट घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरल्यामुळे ही कारवाई झाली आहे.