बीड (रिपोर्टर): शाळा सुरू होताच दुसर्या दिवशी विविध खातेप्रमुखांमार्फत जिल्ह्यातील 11 तालुक्यातील 22 शाळांची तपासणी एकाच दिवशी करण्यात येणार असून शाळेत विद्यार्थी किती आले? शिक्षक हजर झालेत का? विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मिळाले का? याची तपासणी करण्याचे आदेश काल मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक यांनी काढले आहेत.
या शैक्षणिक वर्षाला 15 जूनपासून सुरुवात होत असून 16 आणि 17 हे दोन दिवस सुट्टीचे आहे तर 18 जून हा शाळेचा दुसरा दिवस आहे. शाळा सुरू झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना गणवेष, पाठ्यपुस्तके मिळत नाहीत. मात्र ते मिळाल्याच्या नोंदी घेतल्या जातात. ज्या ठिकाणी दोन शिक्षकी, तीन शिक्षकी शाळा आहेत अशा ठिकाणी शाळेवर एकच शिक्षक जातो, दुसरा शिक्षक गैरहजर असतो, असे अनेक प्रकार आढळून येतात. ही बाब लक्षात घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी पाठक यांनी या वेळी कामचुकार शिक्षक उघडे पडावेत, शाळा सुरू होण्यापूर्वीच प्रत्येक शाळेत पाठ्यपुस्तके पोहचती व्हावीत आणि ती विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशीच मिळावेत. या कामात कोणी हलगर्जीपणा करू नये, हलगर्जीपणा केचला तर त्याला शिक्षा करण्यात यावी, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सर्व, कार्यकारी अभियंता (बांधकाम 1 , 2), पाणीपुरवठा यांच्या नेतृत्वाखाली ही पथके 18 जून रोजी शाळा सुरू होण्यापूर्वीच शाळेवर उपस्थित राहून शाळा सुटेपर्यंत त्याठिकाणी थांबणार आहेत आणि याचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकार्यांना देण्यात येणार आहे.