गेवराई (रिपोर्टर): महसूल आणि पोलीस प्रशासनाने वाळू माफीयांना आंदन म्हणून दिलेल्या गोदा पात्रात वाळू माफियात टोळीयुद्ध सुरू झाले आहे. बोरगाव परिसरामध्ये रात्री अचानक वाळू माफिये जाधव आणि ढाकणे गट समोरासमोर येऊन यात तुंबळ मारामारी झाली. त्यामध्ये सहा ते सात जण गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येते. या जखमींना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. या दोन गटात एवढ्या मोठ्या प्रमाणात मारामार्या झाल्या की त्यातील काहींनी भररस्त्यावर मोटारसायकली जाळल्या. या घटनेने गेवराई तालुक्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, चकलांबा पोलीस ठाणे हद्दीतील बोरगाव बु. परिसरातील गोदापात्र गेवराई तालुक्याच्या हद्दीत आहे तर पलीकडे नगर जिल्ह्याची हद्द येते. नगर जिल्ह्याच्या हद्दीमध्ये मुंगी येथील वाळू माफियांची कायमची दहशत असल्याचे वेळोवेळी निदर्शनास आलेले आहे. मुंगी येथील वाळू माफिया गुंडगिरी करून दहशत माजवून सर्रासपणे गोदापात्रातील वाळूची तस्करी करत आलेले आहेत. त्यांच्या अनेक तक्रारी पोलीस आणि महसूल प्रशासनाकडे आहेत. मात्र रात्री बोरगावातील जाधव आणि ढाकणे गटात वर्चस्वाच्या वादातून तुफान हाणामारी झाली. या हाणामारीत सहा जण रक्तबंबाळ झाले. त्यांना जखमी अवस्थेत छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. या दोन्ही गटांकडून गावात प्रचंड दहशत पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याचबरोबर भररस्त्यावर तीन ते चार मोटारसायकली जाळून टाकण्यात आल्या, अनेक ठिकाणी दगडफेकही करण्यात आली. घटना घडून 12 ते 18 तास उलटल्यानंतरही याबाबत चकलांबा पोलिसात गुन्हा दाखल झालेला नव्हता. गोदा पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाळुची तस्करी केली जाते, वाळू माफिया सर्रासपणे अधिकार्यांच्या अंगावर जातात, जे लोक वाळू उपश्याला विरोध करतात त्यांना धमक्या दिचल्या जातात, मारहाण केली जाते. केवळ लाचखोरीमुळे महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन या माफियांवर कारवाई करत नाहीत. यातून माफिये गुंड बनतात आणि त्यातून ते हल्ले चढवतात. तसाच काहीसा प्रकार रात्री वर्चस्वाच्या वादातून वाळू माफियांच्या दोन टोळीत झाला.
वाळू माफियांकडे चकलांबा पोलिसांचे जाणीवपुर्वक दुर्लक्ष
गोदावरीचा सर्वाधिक पट्टा चकलांबा पोलिसांच्या हद्दीमध्ये येतो. या ठिकाणावरून अनेक वाळू माफिया रात्रंदिवस वाळुचा उपसा करतात. कोण वाळू चोरतय, याची माहिती चकलांबा पोलिसांना असते, मात्र पोलीस जाणीवपुर्वक वाळू माफियांवर कारवाई करत नसल्याचे दिसून येते.