परळी (रिपोर्टर): शहरातील विविध भागांमध्ये हातभट्टी दारूची सर्रासपणे विक्री होत आहे. या दारू विक्रीकडे दोन्ही पोलीस ठाण्याचे प्रमुख दुर्लक्ष करत असून दारू विक्री तात्काळ बंद करण्यात यावी या मागणीसाठी संभाजीनगर पोलीस ठाणे व शहर ठाण्यासमोर नागरिकांनी ठिय्या मांडला होता. या नागरिकांच्या शिष्टमंडळाची पोलीस निरीक्षकांनी भेट घेऊन सदरील दारू दुकाने बंद करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नागरिकांनी आपले आंदोलन मागे घेतले.
शहरातील साठेनगर, भीमनगर यासह अन्य काही भागांमध्ये सर्रासपणे हातभट्टी दारूची विक्री होत आहे. या दारू विक्रीमुळे अनेकजण व्यसनाधीन होत आहेत. पोलीस प्रशासन दारू विक्रेत्यांविरोधात कधीही कारवाई करत नाहीत, उलट त्यांना अभय देण्याचे काम करत आहेत. दारूमुळे शहरातील वातावरण बिघडण्याची शक्यता आहे. दारू विक्रेत्यांविरोधात कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी काही नागरीक रात्री संभाजीनगर व शहर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडून बसले होते. यामध्ये माजी नगराध्यक्ष वैजिनाथ जगतकर, रमेश गायकवाड, नितीन रोडे, संतोष आदोडे, प्रताप समिंदर सवळे, राज जगतकर, अॅड. अर्जुन सोळंके, भैय्या साहेब आदोडे यांच्णयासह आदींची उपस्थिती होती. पोलीस प्रशासनाने संबंधितांविरोधात कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नागरिकांनी आपले ठिय्या आंदोलन मागे घेतले.