परवानगीशिवाय मिरवणूक नाही
साडेचारशे पेक्षा अधिक उपद्रवींना नोटीसा
मतमोजणीच्या ठिकाणासह जिल्हाभरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त
बीड (रिपोर्टर): राज्यात बहुचर्चित आणि लक्षवेधी ठरलेल्या बीड लोकसभा निवडणुकीची मतमोजणी शहरातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय परिसरात 4 जून रोजी होत असून त्या दृष्टीने मतमोजणीच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून जिल्ह्यात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त लावून पेट्रोलिंग सुरू राहणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी देत परवानगी घेतल्याशिवाय कुठलीही विजयी मिरवणूक काढता येणार नाही तसे केल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे ठाकूर यांनी म्हटले. आज त्यांनी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय परिसरात जावून सुरक्षेचा आढावा घेत पाहणी केली. संपूर्ण परिसर सीसीटीव्हीच्या निगराणीखाली असल्याचे सांगत वाहतूक व्यवस्थेतही बदल केला असल्याचे त्यांनी म्हटल.
बीड लोकसभेसाठी चौथ्या टप्प्यात मतदान झाले. भाजपा महायुतीच्या पंकजा मुंडे विरुद्ध महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे यांच्यात थेट लढत असून ही निवडणूक राज्यभरात प्रचंड गाजली. काल एक्झिट पोलचे अंदाज समोर आल्यानंतर आणि मतमोजणीला केवळ 48 ते 52 तास उरले असल्याने बीड पोलीस दल अलर्ट झाले असून आज जिल्हा पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सुरक्षेच्या दृष्टीने मतमोजणी ठिकाणी जावून आढावा घेत पाहणी केली. जिल्ह्यामध्ये मनाई आदेश लागू करण्यात आला असल्याचे सांगून सुरक्षेच्या दृष्टीने साडेचारशे पेक्षा जास्त उपद्रवींना नोटीसा देण्यात आल्या आहेत. त्या लोकांसह जिल्ह्यावर पोलिसांची करडी नजर असल्याचे सांगत मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यासाठी मतमोजणी ठिकाणी दोन अतिरिक्त पोलीस अधिक्षक, चार डीवायएसपी, 70 अधिकारी, 50 कर्मचारी, होमगार्ड, एसआरपी, सीआरएफच्या प्रत्येक एक-एक पथक त्या ठिकाणी तैनात करण्यात येणार आहे. जिल्ह्यात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त लावून पेट्रोलिंग राहणार असून परवानगीशिवाय कोणालाही मिरवणूक काढता येणार नाही. तसे केल्यास गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलीस अधिक्षकांनी माध्यमांना सांगितले.