17 हजार 471 जागांसाठी 17 लाख 76 हजारांपेक्षा जास्त अर्ज
बीडमध्ये 170 जागांसाठी 8 हजार 400 अर्ज
पहाटे पाच वाजल्यापासून बीडमध्ये भरती प्रक्रिया सुरू
बीड (रिपोर्टर): लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये अडकलेली राज्यातील पोलीस भरती अखेर आज प्रत्यक्षात प्रक्रियेत आली. एकूण 17 हजार 471 जागांसाठी ही भरती प्रक्रिया होत असून राज्यभरात तब्बल 17 लाख 76 हजार 256 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. आज पहाटे पाच वाजल्यापासून बीडमध्ये 170 जागांसाठी हजारो सुशिक्षीत बेरोजगारांनी उपस्थिती दर्शवून भरती प्रक्रियेत सहभाग नोंदवला आहे. अत्यंत कडक शिस्तीत पोलीस ग्राऊंडवर ही प्रक्रिया जिल्हा पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या उपस्थितीत पार पडत आहे. म्हणूनच मर्दा, लाव दम आणि होऊन दाखव सिंघम अशा उमेदवारांना उत्साह देणार्या प्रतिक्रिया सर्वस्तरातून व्यक्त होत आहे.
पोलीस शिपाई, शिघ्र कृती दल, चालक, तुरुंग विभाग शिपाई, बँडस्मनच्या तब्बल 17471 जागांवर पोलीस भरती गेल्या दीड महिन्यांपूर्वी होणार होती मात्र लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये ही भरती अहकली. अखेर आचारसंहिता संपल्यानंतर आज 19 जून रोजी संभाजीनगर, पुणे, चंद्रपूर, रत्नागिरी, नाशिक, अमरावती, जळगावसह बीड जिल्ह्यात भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
बीडच्या पोलीस ग्राऊंडवर भरती प्रक्रियेत सहभाग नोंदविण्यासाठी रात्रीपासूनच हजारो उमेदवारांनी हजेरी लावली होती. बीड जिल्ह्यात 170 जागांसाठी ही भरती होत असून 8400 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. ज्या उमेदवारांना आजची तारीख देण्यात आलेली होती ते सर्व उमेदवार पहाटेपासून मैदानात होते. यामध्ये रनिंग, गोळाफेक यासह अन्य बाबी उपस्थित पोलिसांकडून तपासल्या जात होत्या. याआधीची भरतीप्रक्रिया वादग्रस्त ठरल्यामुळे ही भरती पारदर्शक व्हावी यासाठी भरती प्रक्रिया स्थळी कडेकोट बंदोबस्त, शस्त दिसून आली. जिल्हा पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांच्यासह अन्य अधिकार्यांच्या उपस्थितीत ही भरती होत आहे.