जमावबंदी आदेश झुगारल्याने पोलिसांची कारवाई
परळी/धारूर/गेवराई (रिपोर्टर): ओबीसी आंदोलक प्रा. हाके यांना पाठिंबा देण्यासाठी रास्ता रोको करणार्या समर्थकांवर परळी, धारूर, गेवराई पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. 22 पेक्षा अधिक जणांवर गुन्हे दाखल झाले असून पोलीस व जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा ठपका आंदोलकांवर ठेवण्यात आला आहे.
ओबीसी आंदोलक प्रा. हाके हे गेल्या काही दिवसांपासून वडीगोद्री येथे उपोषण करत आहेत. त्यांच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी काल गेवराई तालुक्यातील कल्याण ते विशाखापट्टणम जाणार्या महामार्गावर सिरसमार्ग फाटा याठिकाणी काही ओबीसी समर्थकांनी रस्ता अडवून धरला. पोलीस व जिल्हाधिकार्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले म्हणून पो.कॉ. गर्जे यांच्या फिर्यादीवरून सुरेश मारकड, भास्कर मारकड (रा. तरटवाडी), करण काळे, लक्ष्मण कोळकर यांच्या विरोधात गेवराई पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर तिकडे परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यात ईटके कॉर्नर येथे रस्ता रोखून धरणार्या ज्ञानेश्वर मुंडे, विकास मुंडे (रा. कन्हेरवाडी), संजय देवकर, रविभूषण नागरगोजे, सोनु गर्जेयांच्यासह दहा ते पंधरा आंदोलकांवर कलम 381, 188 भा.दं.वि.नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. इकडे धारूर तालुक्यातील खामगाव ते पंढरपूर रस्ता गावंदरा येथे रोखून धरणार्या बाबासाहेब बडे, बिभिशन बडे, गणेश बडे, सुरेश घुले सदानंद घुले, हनुमंत घुले, सुभाष बडे, दिलीप बडे व इतर 14 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्ह्यात सध्या जमावबंदी आदेश लागू करण्यात आलेला आहे. त्या आदेशाचे उल्लंघन करणार्यांवर पोलिसांकडून थेट गुन्हे दाखल करण्यात येत आहे.