Thursday, October 21, 2021
No menu items!
Homeराजकारणमहाआघाडी स्वस्थ अस्वस्थ भाजपा

महाआघाडी स्वस्थ अस्वस्थ भाजपा

महाआघाडी स्वस्थ
अस्वस्थ भाजपा

महाआघाडी सरकारला नुकतचं वर्ष झालं. सरकार स्थापन झाल्यापासून भाजपावाले रोज सरकार पडणार असल्याची भविष्यवाणी करत होते. तसं ते मुहूर्त ही सांगत होते. तीन पक्ष तिन्ही विचारांचे असल्याने या सरकारबद्दल कोणालाच भरोसा वाटत नव्हता, एक वर्षाचा कार्यकाळ विना तक्रारी लोटला, सरकार स्थापन झाल्यानंतर कोरोनाचा संकटकाळ समोर उभा राहिला. कोरोनामुळे देशातील अर्थव्यवस्था पुर्णंता झोपली, महाराष्ट्रात ही अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला.

thakare

सरकार चालवण्यासाठी विरोधी पक्षांची तितकी साथ मिळायला हवी, पण ती साथ मिळाली नाही हे दुर्देव म्हणावं लागेल. संकट काळात विरोधकांनी सत्ताधार्‍यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजं हा एक सुसंस्कृतपणा आहे. सरकार कोणत्याही पक्षाचं असो संकटात विरोधकांनी चांगली भुमिका घ्यायला पाहिजे, त्यात राजकीय स्वार्थ नसावा, मात्र भाजपाने कोरोनाच्या काळात आपलं राजकारण काही कमी केलं नाही. लॉकडाऊमध्ये मोर्चे, आंदोलन करुन शासनाच्या नियमाची पायमल्ली केली. एकीकडे केंद्र सरकार नियम पाळा म्हणुन सांगत होते.

sharad pawar

दुसरकीडे राज्यातील भाजपावाले राज्यात नियम पाळत नव्हते. मात्र जेव्हा,जेव्हा पंतप्रधान मोदी यांनी कोरोना पाळवण्यासाठी टाळ्या, थाळ्या वाजवा असं सांगितलं तेव्हा भाजपावाले टाळ्या वाजवत होते, राज्य सरकारने नियमाचे पालन करा म्हणुन आदेश दिले तर तेव्हा भाजपावाल्यांना राज्याचे नियम मान्य नसायचे जाणीवपुर्वक नियमाचे उल्लघन करत होते, गुन्हे दाखल केले की पुन्हा ओरड असायची बघा ह्या सरकारचा कसा कारभार आहे? महाआघाडी सरकार हे बदनाम कसं होईल याचाच प्रयत्न भाजपावाले करत होते, हे सरकार काही बदनाम झालं नाही, बदनाम झाले ते भाजपावाले, त्यांनी नको त्या गोष्टीला हवा दिली, नको ते आरोप केले. यातून भाजपाचा फायदा होण्याऐवजी नुकसानच झालं.


मुख्यमंत्र्यांची लोकप्रियता
राष्ट्रवादी, शिवसेना,कॉंग्रेस या तिन्ही पक्षात मुख्यमंत्री कोणाला करायचं हे मोठं आव्हान होतं. तिन्ही पक्षाला सोबत घेवून सरकार चालवणं हे सोपं काम नाही. शिवसेनेचा मुख्यमंत्री इतर कुणी झाला तर सरकारमध्ये मतभेद निर्माण होऊ शकतात, याचा विचार खा. पवारांनी केला असावा, त्यामुळे त्यांनी आपल्या ‘चाणक्य‘बुध्दीचा वापर करुन उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावर बसवलं. उध्दव ठाकरे यांच्या नावाला कुणाचाच विरोध नव्हता. उध्दव ठाकरे यांना विधीमंडळाचा कसलाही अनुभव नव्हता. त्यांच्यासाठी विधीमंडळाचं कामकाज पुर्णंता नवं होतं, पण त्यांची काम करण्याची पध्दत पाहता ते नवे आहेत असं बिलकुल वाटत नाही. त्यांच्यामध्ये एक मुरब्बी सत्ताधीश लपलेला होता असंच त्यांच्या कामावरुन दिसून येवू लागलं.

संयमी भुमिका, सत्तेचा कसलाही गर्व नाही. खुनशी राजकारण नाही, या गुणामुळे मुख्यमंत्री ठाकरे हे राज्यातील जनतेत लोकप्रिय मुख्यमंत्रीपदी म्हणुन नावारुपाला आले. कोरोनाचा संकटकाळ असतांना अशा काळात निर्णय घेणं खुप अवघड असतं. थोडी चुक झाली तर बदनामीचा डाग लागतो. त्यातच जनतेला दिलेले आश्‍वासन असतात, अशा वेळी योग्य ते निर्णय घेता आले पाहिजेत. कोरोनाची महामारी असतांना अतिरिक्त पाऊस झाल्याने या पावसात राज्यातील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते. नुकसान भरपाई देणे तितकी खरी गरज होती. पंचनामे करुन हेक्टरी दहा हजार रुपये देण्यात आले. पाच वर्ष भाजपाचं सरकार होतं. पंधरा वर्ष कॉंग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार होतं. या वीस वर्षात अनेक वेळा दुष्काळ, गारपीठ, अतिरिक्त पाऊस असे नैसर्गीक संकट कोसळले. या वेळी त्या- त्या सत्ताधार्‍यांनी शेतकर्‍यांना मदत दिली, ती हेक्टरी आठ हजाराच्या पुढे दिली नाही. त्यातही जिरायत, बागायत अशी विभागणी मदत देतांना करण्यात आली.

फळबागांना अठरा हजारापेक्षा जास्त मिळाले नाही. मात्र मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोरोनामुळे अर्थव्यवस्था डबघाईला असतांना शेतकर्‍यांचा विचार करुन सरसकट हेक्टरी दहा रुपये रुपये दिले, इतकी मदत आज पर्यंत कोणत्याही सत्ताधार्‍यांनी दिली नाही,पण माजी मुख्यमंत्री फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि त्यांचे भाजपाचे जे काही नेते आहेत, ते मदतीबाबत नाकाने वांगे सोलत होते, मदत कमी दिली अशी ओरड करत होते. त्यांनी आपल्या पाच वर्षाच्या काळात घेतलेल्या निर्णया बाबत आत्मचिंतन करावे म्हणजे त्यांना कळेल की, आपण शेतकर्‍यांना किती मदत दिली?


उठसुठ राज्यपालाकडे
कुठलीही मागणी करायची असेल किंवा कुठले ही निवेदन द्यायचे असेल तर ते मुख्यमंत्र्याकडे दिले पाहिजे. तसं न करता विरोधी पक्ष नेते फडणवीस आणि त्यांची भाजपा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे जात असत. त्यामुळे राज्यपालांना चांगलाच ‘भाव’ आला. राज्यपाल हे भाजपा नियुक्त आहेत, घटनेनुसार राज्यपालांनी काम केले पाहिजे, राज्यपाल हे कुठलेही पक्षाचे नसतात, सर्वाचे असतात, मात्र राज्यपाल यांच्या वर्तनावरुन ते भाजपाचे अधिक प्रिय वाटतात, सत्ताधार्‍या बद्दल त्यांच्या मनात काही प्रमाणात आकस दिसून आला. राजकीय कामे हे राज्यपालांच्या मार्फत सुटत नसतात, ते मुख्यमंत्र्यांच्याच माध्यमातून होतात, हे मुख्यमंत्री राहिलेल्या देवेंद्र फडणवीस यांना कळू नये म्हणुन त्यांचा तो दुधखुळेपणा आहे. राज्यपालांना विरोधकांनी इतकं महत्व दिलं की, उठसुठ राज्यपालाचीच चर्चा होवू लागली. जसे की, मुख्यमंत्रीपदाचा पदभारच राज्यपालाकडे देण्यात आला होता की, काय असं वातावरण निर्माण करण्यात आलं.

सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात समन्वय घडवण्याचं काम राज्यपालाचं असतं, पण राज्यपालांनी तसा समन्वय घडवून आणला नाही. जे नियमात बसत नाही ते नियमात बसवण्याचा जाणीवपुर्वक प्रयत्न राज्यपाल महोदयांनी केला. जसं की, पहाटे फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी उरकण्यात आला. लोकं झोपेत असतांना त्यांनी या दोघांना शपथ दिली. लोकांना विश्‍वास बसत नव्हता, या शपथविधी बाबत, इतके महान कार्य राज्यपालांच्या आर्शिवादाने झाले हे कार्य महाराष्ट्र कधी विसरु शकत नाही.


कुरापती सुरुच!
फोडाफोडी करुन सत्ता पदरात पाडून घ्यायची ही भाजपाची जुनीच सवय आहे. तिन्ही पक्षातील काही आमदार फुटतात का याकडे भाजपाचे लक्ष असायचे, फोडाफोडीचे तसे जोरदार प्रयत्न झाले पण त्यांना काय यश आले नाही. आज ही फडणवीस म्हणत असतात, मी पुन्हा येईल! एकदा तोंडावर पडल्यानंतर ही त्यांची पुन्हाची भाषा काही बंद झालेली नाही. सत्तेचा इतका मोहा फडणवीस यांना आहे की, त्यासाठी ते वाट्टेल ते करण्याच्या भानगडी वर्षभर करत राहिले. आपल्याला सर्व काही समजतं आणि दुसर्‍यांना काहीच कळत नाही असा त्यांना ‘दर्प‘ चढलेला असतो.

त्यांची व त्यांच्या नेत्यांची भाषा पुर्णंता बदललेली आहे. कोणाबाबत काय बोलावे याचं भान भाजपाल्यांना राहिलेलं नाही. खा. शरद पवार यांच्याबाबत चंद्रकांत पाटील नेहमीच खालच्या पातळीवर जावून आरोप करतात. जे काही त्यांची तितका ‘औकात’ नाही तरी पाटील पवार बाबत जे काही वाचाळ बोलतात, त्यावरुनच त्यांची ‘अक्कल’ कळते. भाजपाचे इतर नेते ही बोलतांना इतके घसरत असतात. की, आपण नेमकं कोणत्या अवस्थेत आरोप करतोत हे त्यांची त्यांनीच कळत नाही. बोलण्यातून आरोप करणारांची कुवत कळत असते. वर्षभरात कंगना काय, राणे कंपनी काय किंवा आ. गोपीचंद पडळकर काय ही मंडळी जे काही बोलत होती, ते वैयक्तीत बोलत नव्हते तर भाजपा त्यांच्याकडून हे बोलून घेत होती. सुशांतसिंह प्रकरणात काय गदारोळ करण्यात आला. आकाश-पाताळ एक करण्यात आलं. इतका मोठा गजहब भाजवाल्यांनी केला. एका आत्महत्या प्रकरणावरुन एवढा मोठा तमाशा भाजपाने केला. हा तमाशा भाजपा सोडता कोणालाच आवडला नाही. पाच वर्षात भाजपाच्या काळात शेतकरी आत्महत्या मोठया प्रमाणात झाल्या, त्यावेळी ही वाचाळ मंडळी कुठे झोपीला गेली होती?


एकीचं बळ
भाजपाचा ओव्हारपणा शिवसेनेला सहन झाला नाही. त्यासाठी भाजपा सोबतची २५ वर्षाची युती शिवसेनेने तोडली. आता शिवसेना कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सोबत आल्याने भाजपावाल्यांचा इतका तिळपापड झाला की, शिवसेना पहिली कशी होती, आता कशी झाली. त्यात इतके बदल कसे झाले असं भाजपावाले बोलत असतात. ज्या वेळी शिवसेना भाजपा सोबत होती, तेव्हा शिवसेना चांगली होती, आताच कशी काय वाईट झाली? शिवसेनेला राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसची साथ मिळाल्याने शिवसेनेचा मुख्यमंत्री होवू शकला. राज्यात एक वेगळ्या राजकीय शक्तीचा जन्म झाला. देशात भाजपाचं वारं असतांना आणि देशातील अनेक राज्य भाजपाच्या ताब्यात येत असतांना महाराष्ट्राने मात्र भाजपाचं पुरतं नाकच कापलं होतं.

त्यामुळे भाजपावाले शिवसेनेवर जास्त ‘खार’ खावून आहेत. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीतील नेते अनुभवी आहेत. या दोन्ही पक्षातील नेत्यांना सरकार चालवण्याचा अनेक वर्षाचा अनुभव असल्यामुळे राज्यातील सरकारचा गाडा सुरळीत रुळावर चाललेला आहे. या तिन्ही पक्षात अंतर्गत काही प्रमाणात नाराजी होत असेल, मात्र ही नाराजी म्हणजे सरकार पाडण्याची असू शकत नाही. सरकार पाडून कुणीच खुष राहू शकत नाही. याची जाण या तिन्ही पक्षाला असणार आहे. सरकार स्थापन झाल्यापासून निवडणुकीला सरकार तोंड गेलंलं नाही.

मात्र नुकत्याच राज्यातील सहा विधानपरिषदेच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत सत्ताधारी तिन्ही पक्षांनी एकत्रीत येवून लढा दिला. या तिघांच्या एकीपुढे भाजपाचा पुरता बोर्‍या वाजला. नागपुर सारख्या बालेकिल्यात भाजपाला सुरुंग लागलं. अनेक वर्षापासून नागपुर पदवीधरची जागा भाजपाच्या ताब्यात असायची, मात्र ही जागा महाआघाडीने आपल्या ताब्यात घेतल्याने भाजपाचं पानीपत झालं. या निवडणुकीतून भाजपाला बराच सुचक इशारा दिलेला आहे. निवडणुकीच्या पराभवामुळे भाजपात अस्वस्थता निर्माण झाली. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील नेहमीच तोर्‍याची आणि एकहाती भाजपाचा झेंडा फडकवण्याची भाषा करत होते. पाटील यांना ही त्यांच्या मतदार संघात जबरदस्त झटका बसला. आता तरी त्यांनी यातून काही बोध घेतला पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निकालानंतर खा. शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत महाआघाडी पंचवीस वर्ष टिकेल, असे सांगितले, पवारांची ही प्रतिक्रिया भाजपाच्या पोटात गोळा आणणारीच आहे.

Most Popular

error: Content is protected !!