परळीतही इन्टाग्रामवर प्रतिक्रिया, गुन्हा दाखल
परळी/परभणी (रिपोर्टर): भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या विषयी समाज माध्यमावर अश्लील भाषेत आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे परभणीच्या जिंतूर शहरांमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. एका युवकाने पंकजा मुंडे विषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकली त्याच्यावर जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्या आरोपीस ताब्यात घेतले आहे. पंकजा मुंडे यांच्या विषयी केलेल्या आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी ओबीसी समाज प्रचंड आक्रमक झाला असून आज सकाळपासून जिंतूर शहर बंद ठेवण्यात आले आहे.तर दुसरीकडे परळी शहर पोलिसातही एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानेही आपल्या इन्स्टाग्रामवर पंकजा मुंडेंविरोधात आक्षेपार्ह प्रतिक्रिया नोंदवली.
भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या विषयी इन्स्टाग्रामवर अभी तळेकर पाटील या इन्स्टाग्रामवर आयडीवरून अश्लील शब्दात पोस्ट केल्याचे रविवारी रात्री निदर्शनास आले. या पोस्टमुळे सकल ओबीसी समाज बांधवांच्या भावना दुखावल्या. पोस्टची चर्चा संपूर्ण जिंतूर तालुक्यासह जिल्हाभरात सुरू झाली. पोस्ट करणार्याचा निषेधही समाज माध्यमांवर करण्यास सुरुवात झाली. काही ओबीसी समाज बांधवांनी काल रविवारी रात्रीच जिंतूर पोलीस ठाणे गाठले. आक्षेपार्ह पोस्ट करणार्या त्या संबंधित युवकाला अटक करा अशी मागणी करण्यात आली. बघता बघता जिंतूर पोलीस ठाण्यासमोर मोठ्या संख्येने ओबीसी बांधव जमा झाले. त्यानंतर जिंतूर पोलिसांनी संबंधित युवकाविषयी अविनाश काळे यांच्या तक्रारीवरून गुन्हा देखील दाखल केला. भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या विरोधात आक्षेपार्ह प्रतिक्रिया व्यक्त केल्याने जगमित्र कार्यालयातील कर्मचारी पवन केशव राठोड यांच्या फिर्यादीवरून आरोपीविररुद्ध गु.र.नं. 93/2024 कलम 153 (अ) 505 (2) भा.दं.वि.सह कलम 67 आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ससाणे हे करत अहेत.