बीड (रिपोर्टर): बीड शहरातील मोंढा भागात असलेल्या मुक्तीधामकडे जाणार्या बिंदुसरेच्या पुलावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. या भागातील रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी आज मनसेने शासन आणि प्रशासन व्यवस्थेला आत्मचिंतीत करावयास लावणारे आंदोलन केले. मनसेने थेट पुलावरच लाकडे टाकून चिता रचली अन् त्या चितेवर एका मनसे सैनिकाला झोपवण्यात आलं. या रस्त्यावरून प्रवास करणार्या वाहन धारकाच्या जिवाला धोका असल्याचे यातून त्यांना स्पष्ट करावयाचे होते.
मोंढा भागाकडे जाणार्या बिंदुसरेच्या पुलावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या भागातला रस्ताही नादुरुस्त आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून सदरच्या रस्त्याचे काम तात्काळ करण्यात यावे, पुलाची चांगली डागडुजी करण्यात यावी, या मागणीसाठी मनसे रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. मात्र त्यांच्या आंदोलनाकडे शासन आणि प्रशासन व्यवस्था सातत्याने दुर्लक्ष करताना दिसून येते. आज सरशेवटी मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुक्तीधामकडे जाणार्या पुलावर थेट लाकडे रचून सरण रचलं. त्यावर मनसे सैनिकाला झोपवण्यात आलं. या रस्त्याने जो प्रवास करील त्याचे हाल असे होतात, हे शासन-प्रशासन व्यवस्थेला त्यांनी दाखवून दिलं. मनसेचे आंदोलन हे व्यवस्थेला आत्मचिंतीत करून सोडणारे आहे. या आंदोलनाची सर्वत्र चर्चा होत आहे.