बीड (रिपोर्टर): आष्टी तालुक्यातील कडापासून काही अंतरावर असलेल्या सुर्डी गावात जानेवारी महिन्यामध्ये जुन्या वाड्याचे खोदकाम करताना एका भिंतीच्या देवळीत घागरभर गुप्त धन सापडल्याचा दावा केला जात असून सोशल मिडियावर त्या नाण्यांचा खणखणाट व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी यातील दोघांना चौकशीसाठी बोलवल्याचे सांगण्यात येते. मात्र या प्रकरणी अद्याप महसूल विभाग अथवा पुरातत्व विभागाकडे कसलीही माहिती नसल्याचे सांगितले जाते.
याबाबत अधिक असे की, आष्टी तालुक्यातील सुर्डी गावात जानेवारीमध्ये एका जुन्या वाड्याचे खोदकाम सुरू होते. त्या दरम्यान एका भिंतीच्या देवळीत एक घागर मिळून आली. मजुरांनी ती बाहेर काढली त्यावेळी त्यामध्ये सोन्याचे नाणे मिळून आल्याची चर्चा होत आहे. वाटाघाटीत बिघाड झाल्यानंतर एकाने त्यातील काही नाण्यांचा फोटो काढून व्हायरल केला व गुप्त धनाची माहिती आष्टी पोलिसांना दिली. पोलिसांनी त्या माहितीच्या आधारे गावात जावून व्हिजिट केल्याचेही बोलले जाते. त्यातील दोघांना चौकशीसाठी बोलवण्यात आले. मात्र यामध्ये किती गुप्तधन सापडलं, खरच गुप्तधन सापडलं का? त्या गुप्तधनाची विल्हेवाट कोणी लावली याची माहिती अद्यापही पोलीस, महसूल विभाग अथवा पुरातत्व विभागाकडे नाही. त्या गुप्त धनातील काही नाण्यांचा फोटो मात्र सोशल मिडियावर फिरत आहे.