बीड (रिपोर्टर): जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळा जिल्ह्यात बोटावर मोजण्या इतक्याच आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या माध्यमिक शाळात सरळसेवेने शिक्षकांची भरती झालेली नाही. याच्यापूर्वी माध्यमिक शाळात काम करणार्या शिक्षकांमधून उपशिक्षणाधिकारी आणि शिक्षणाधिकारी ही पदे बढती द्वारे भरली जात होती. मात्र 2022 रोजी शासन आदेश काढून बढती देणे बंद केले आहे. हा आदेश मागे घ्यावा आणि इतर मागण्यांसाठी माध्यमिक शिक्षकांच्या संगटनांनी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे.
356 उपशिक्षणाधिकारी आणि राजपत्रित मुख्याध्यापकांची जी पदे रिक्त आहेत ती तात्काळ भरावीत, संचमान्यता संदर्भात अन्याय करणारा शासन आदेश 15 मार्च 2024 रद्द करण्यात यावा, माध्यमिक शिक्षकांच्या गेल्या दहा वर्षांपासून बदल्या करण्यात आलेल्या नाहीत, त्या करण्यात याव्यात, 1 नोव्हेंबर 2005 पासून नियुक्त झालेल्या माध्यमिक शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, शिक्षकांची वरिष्ठ वेतनश्रेणी, वेतनवाढ आणि आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात याव्यात, जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळांमध्ये शिपाई नसल्यामुळे शिपायाचे सर्व कामे शिक्षकांनाच करावे लागते त्यामुळे या शाळेत शिपायांची नियुक्ती करण्यात यावी, चित्रकला शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी, या सव इतर मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन सुरू केलेले आहे. या धरणे आंदोलनामध्ये घायाळ बी.आर., मुळे ई.आर, कोळेकर व्ही.एस., राऊत एन.जे., बनकर एनपी आणि लाड आदींचा सहभाग होता.