बीड (रिपोर्टर): विठ्ठल नामाचा गजर, ज्ञानोबा-तुकारामाचा निनाद, टाळ मृदंगाची साद अन् मुखी विठ्ठल नामात मग्न झालेल्या संत मुक्ताई आज बीड शहरात डेरेदाखल झाल्या. संत मुक्ताईच्या पालखीचे बीडच्या वेशीपासून ते शहरभरामध्ये मोठ्या उत्साहात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. कुठे फटाक्यांची आतीषबाजी तर कुठे ढोल-ताशांच्या गजराने स्वागत करण्यात येत होते. दिंडीत चालणार्या वारकर्यांसाठी फराळ पाण्याची व्यवस्था ठिकठिकाणी केली होती. तर दुसरीकडे संत मुक्ताईंच्या पादुकांचे दर्शन हजारो बीडकरांनी घेतले. आज संत मुक्ताई बीड शहरामध्ये मुक्कामी असतील, आज सायंकाळी माळीवेस मारुती मंदिर येथे मुक्कामी तर परवा त्या बिंदुसरेच्या तिरावर आजोबा गोविंद पंतांची भेट घेत मुक्ताईंची दिंडी पुढे पंढरपूरकडे कुच करेल.
आषाढी एकादशीनिमित्त विटेवर उभा असलेल्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून शेकडो दिंड्या पंढरपुराकडे विठ्ठल नामाच्या गजरात कूच करत आहेत. महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या सात प्रमुख दिंड्यांपैकी एक असलेली संत मुक्ताईंची दिंडी आज बीड शहरात डेरेदाखल झाली. संत मुक्ताई आणि बीडचे एक वेगळे नाते असून संत मुक्ताई प्रत्येक वर्षी आपले आजोबा गोविंद पंतांचे दर्शन घेण्यासाठी बीड शहरात दोन दिवस मुक्कामी असतात.
प्रत्येक वर्षी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास बीडमध्ये येणारी दिंडी आज काहीशी उशीराने बीडमध्ये दाखल झाली. विठ्ठल नामाचा गजर, ज्ञानोबा तुकारामांचा निनाद, टाळ मृदंगाची साद, मुखी विठ्ठल नाम, हातात भगवा ध्वज, कपाळी गोपीचंद बुक्का आणि हातात टाळ वाजवत निघालेली दिंडी ही अवघ्या बीड शहराला भक्तीमय करून टाकत होती. ठिकठिकाणी हजारो भक्त मुक्ताईंच्या पादुकांचे मनोभावे दर्शन घेत होते. शहरात वारकर्यांसाठी ठिकठिकाणी सेवेकरी सेवा देताना दिसून आले. मुक्ताईंच्या येण्याने भक्तीमय झाले.