दहा तारखेला ग्रामसभेचे आयोजन
नेकनूर (रिपोर्टर): बीड तालुक्यामध्ये नेकनूरची ग्रामपंचायत सर्वात मोठी आहे. या ग्रामपंचायतीला नगरपंचायतचा दर्जा मिळावा, अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून होत आहे. येत्या काही महिन्यांमध्ये ग्रा.पं.ला नगरपंचायतचा दर्जा मिळू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. शासनाने दहा जुलैला ग्रामसभा आयोजीत करून ग्रामपंचायतबाबत ठराव घ्यावा, असे निर्देश दिले आहेत.
बीडपासून काही अंतरावर असलेल्या नेकनूर ग्रामपंचायतला नगरपंचायतचा दर्जा मिळावा, अशी मागणी सातत्याने शेख अरशद सह आदींनी केली होती. त्यासाठी ग्रामसभा आयोजीत करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली होती. त्यांच्या या मागणीला यश येऊ लागले असून 10 जुलैला ग्रामसभा आयोजीत करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. या ग्रामसभेत ठराव घेऊन तो ठराव राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. येत्या काही महिन्यांमध्ये नेकनूर ग्रामपंचायत नगरपंचायत होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जाऊ लागला आहे.