मुंबई (रिपोर्टर): राज्यातील दूध उत्पादक शेतकर्यांच्या दुधाला योग्य भाव द्या या प्रमुख मागणीसाठी पावसाळी अधिवेशनाच्या सातव्या दिवशी विधिमंडळ परिसरात महाविकास आघाडी आक्रमक झाली. महाविकास आघाडीच्या आमदारांनी हातात दुधाची बाटली आणि टाळ घेऊन ’रामकृष्ण हरी शेतकरी फिरतोय दारोदारी’, अशा घोषणा देत सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली.
पावसाळी अधिवेशनात दूध उत्पादक शेतकर्यांना दुधाला भाव मिळत नाही, यासाठी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायर्यांवर जोरदार निदर्शने केली. दूध भुकटी धोरण, शेतकर्यांचे होते मरण, अनुदानाची भीक नको, शेतकर्यांना द्या हक्काचे दर , अनुदानाची कशाला दाखवताय आस, भुकटी आयात करून पाडताय भाव, दुधाला नाही दर, सरकार वसूल करते शेतकर्यांकडून कर अशा विविध घोषणा लिहिलेले फलक हाती घेत शेतकर्यांच्या दुधाला योग्य दर मिळावा यासाठी महायुती सरकारला घेरले.दुधाला योग्य भाव न देणार्या सरकारचा धिक्कार असो, शेतकर्यावर अन्याय करणार्या सरकारचा धिक्कार असो, शेतकर्याला फसवणार्या सरकारचा धिक्कार असो, शेतकरी लागला दारोदारी सरकार स्वतःचे पोट भरी, दुधाला भाव तरी द्या रे , शेतकरी फिरतोय दारोदारी,सरकार अदानीचे पोट भरी अशी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले.