मुंबई (रिपोर्टर): राजकारणात आल्यापासून मी कोणताही पक्ष बदललेला नाही. पहिल्या दिवसापासून राज्यातील जनता हाच माझा पक्ष राहिलेला आहे. मी पूर्वीही जनतेचाच होतो आणि आजही जनतेचाच आहे, असे विधान राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी केले. अजित पवार यांनी आपल्या अधिकृत ट्विटरद्वारे एक व्हिडीओ ट्विट केला आहे. या व्हिडिओत अजित पवार हे राज्यातील जनतेला भावनिक साद घालताना दिसत आहेत. तसेच, या व्हिडिओद्वारे राज्यातील अर्थसंकल्पातील विविध मुद्द्यांवर भाष्य करत विरोधकांनाही टोला लगावला आहे.
आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून अर्थसंकल्प मांडण्यात आल्याचा मुद्दा विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळी अजित पवारांनी विशेष व्हिडीओ संदेश जारी करत विरोधकांच्या आरोपांना उत्तर दिले आहे. दरम्यान, राजकीय वर्तुळात पाहिले तर अजित पवार अशाप्रकारे विशेष कॅमेरा सेटअप लावून व्हिडिओद्वारे माहिती देताना दिसून आले नाहीत. मात्र, रोखठोक आणि परखड बोलण्याची शैली असलेल्या अजित पवार यांनी अशाप्रकारे प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
माझ्या महाराष्ट्रवासीयांनो, मी काही दिवसांपूर्वी अर्थसंकल्प सादर केलेला आहे तो तुम्ही सर्वांनी पाहिला असेलच. राज्याच्या अशा प्रकारच्या ऐतिहासिक अर्थसंकल्प सादर करण्याचा भाग्य मला लाभले याचा मला सार्थ अभिमान आहे. या अर्थसंकल्पात माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा करण्यात आली या योजनेच्या माध्यमातून राज्यातील 21 ते 60 वयोगटातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात तर मला दीड हजार रुपये जमा केले जाणार आहेत. या योजनेवर राज्य सरकार प्रतिवर्षी 46 हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. आजवर आपण पाहत आलोय की प्रत्येक कुटुंबातील आई स्वतःवरील खर्च शक्य तितकी काटकसर करते, पण आपल्या मुलाबाळांना काही कमी पडणार नाही, याची काळजी ती घेते. परंतु काही वेळा परिस्थितीशी अशी निर्माण होते की आर्थिक अडचणीमुळे घरातील मुलांच्याकडं जास्त लक्ष दिलं जातं आणि नेमकं मुलींकडे दुर्लक्ष होतं. मात्र, आता मला आशा आहे की माझी लाडकी बहीण या योजनेच्या माध्यमातून मिळणार्या अर्थसाहयाच्यामुळे राज्यातील माता-भगिनींची ही विवंचना दूर होईल.
राज्यातील प्रत्येक महिला आर्थिक सामाजिक दृष्ट्या सक्षम व्हावी, स्वतःच्या पायावरती उभे राहावी. कुठल्याही महिलेला असं वाटू नये की, आपण दैनंदिन गरजांसाठी वडील भाऊ किंवा नवर्यावर अवलंबून आहोत. त्यामुळेच ज्यावेळी माझी लाडकी बहीण योजनेचा विचार करतो तेव्हा मलाही योजना म्हणजे महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने टाकण्यात आलेलं अत्यंत क्रांतिकारी पाऊल वाटतं. आमच्या सरकारने आपल्या अनुभवाच्या जोरावर हे अशक्य वाटणारे काम शक्य करून दाखवलेले आहे. एवढेच नाही तर राज्यातील माता-भगिनींनी पुरुषांच्या तुलनेत कुठेही मागे राहणार नाही, हे सुनिश्चित करण्यासाठी इतर अनेक पावलं उचलण्यात आलेली आहेत. अर्थसंकल्पात राज्यात 25 हजार नवीन उद्योगांच्या उभारणीसाठी देखील आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे त्यापैकी 30 टक्के युनिटमध्ये महिला उद्योजकांना साहाय्य केलं जाणार आहे. महिलांना पिंक ई-रिक्षा चालविण्यास सक्षम बनवलं जाणार आहे. शिवाय शाळा-कॉलेजांमध्ये शिकणार्या मुलींना देखील मोफत शिक्षण दिले जाणार आहे. आणखी एक महत्त्वाची योजना म्हणजे युवा कार्यप्रशिक्षण योजना आणि या योजनेच्या माध्यमातून आपल्या राज्यातील तरुण-तरुणींना औद्योगिक प्रशिक्षण आणि सोबतच 10 हजार रुपयांपर्यंत स्टायपेंड दिला जाईल. महिला, तरुण, तरुणींच्या सक्षमीकरणाच्या बरोबरीनं राज्याच्या अध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा जपण्याचा आणि पुढे नेण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यासाठी आपल्या वारकरी बांधवांसाठी मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे. पंढरपूर वारीला जागतिक नामांकन मिळावं यासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवणे, वारीतल्या मुख्य पालख्यांतील दिंड्यांना प्रतिदिंडी 20 हजार रुपये देणे असे अनेक महत्त्वाचे निर्णय आम्ही घेतलेले आहेत.