मुंबई (रिपोर्टर): महाराष्ट्र राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा आठवा दिवस विविध मुद्यांनी गाजला. अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच विरोधकांनी महागाईच्या मुद्यावर सरकार विरोधात विधान भवनाच्या पायर्यांवर घोषणाबाजी करत आंदोलन केले तर शेतकर्यांच्या विमा प्रश्नावर आक्रमक झालेल्या विरोधकांना धनंजय मुंडेंनी चोख उत्तर देत वस्तूस्थिती सांगितली. अर्थसंकल्पावर बोलताना अर्थमंत्री अजित पवार यांनी मी आठ ते नऊ वेळा अर्थसंकल्प मांडल्याचे सांगत अर्थसंकल्पापूर्वी काही बातम्या वर्तमानपत्रात माध्यमामध्ये आल्या म्हणजे अर्थसंकल्प कुठला? असं म्हणता येणार नाही, असा टोला त्यांनी थेट शरद पवारांना लगावला. गेल्या काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी अर्थसंकल्पावर भाष्य करत तो फुटल्याचे म्हटले होते.
आज सकाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. त्यामुळे विरोधकांनी विधान भवनाच्या पायर्यांवर घोषणाबाजी करत आंदोलन केले. महागाईच्या मुद्यावरून आक्रमक झालेल्या विरोधकांनी सरकारचा धिक्कार केला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माफीनामा लिहून दिल्यानंतर त्यांना आज सभागृहामध्ये बसू देण्यात आले. त्यामुळे अंबादास दानवे यांनी निलंबन मागे होताच पायर्यांवर सरकारचा धिक्कार केला. शेतकर्यांचा विमा प्रश्न, अर्थसंकल्प यावर आज विधानसभेमध्ये चर्चा झाली. अनेक जणांना विमा मिळत नाही. विमा कंपन्या दुर्लक्ष करतात. फळबागांना विमा दिला जात नाही. सॅटेलाईटद्वारे देण्यात आलेल्या इमेज बाबत मुद्दा उपस्थित झाल्यानंतर कृषीमंत्री धनंजय मुंडेंनी त्यावर उत्तर दिले. मुंडे म्हणाले, पीक विम्याच्या कायद्यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले आहे, एखाद्या शेतकर्याला पीक विमा मंजूर झाला, तर 15 दिवसांच्या आत त्या शेतकर्याच्या खात्यावर ती रक्कम पोहचली पाहिजे. जर त्या कालावधीमध्ये रक्कम पोहचली नाही तर लाभार्थी शेतकर्याला व्याजासह विमा कंपन्यांना परतावा करावा लागेल, हा कायदा आहे. जर असं पाळलं नाही तर त्या विमा कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद आहे. दुसरीकडे फेरीवाल्यांचा विषय आज विधानसभेमध्ये चांगलाच गाजला. अर्थसंकल्पावर सभागृहात चर्चा झाली. यामध्ये 70 सदस्यांनी सहभाग नोंदवला. त्यावर आज अर्थमंत्री अजित पवार यांनी उत्तर देताना म्हटले, अर्थसंकल्प जाहीर करत असताना राज्याचा सर्वांगीन विकास व्हावा, प्रत्येक घटकाला संधी मिळेल यासाठी प्रयत्न केले. जयंत पाटलांनी नऊ वेळा अर्थसंकल्प मांडला आहे तर मी दहाव्या वेळी अर्थसंकल्प मांडत आहे. आम्हालाही अनुभव आहे त्यामुळे कोणत्याही बाजुला असलो तरी अर्थसंकल्प मांडण्याची जबाबदारी दिली जात होती, महायुतीकडून मांडला तर महाविकास आघाडीकडून विरोध होतो, महाविकास आघाडीकडून मांडला तर महायुतीकडून विरोध होतो. विरोधकांनी उपस्थित केलेल्या त्रुटींचे मी समाधान करत आलो आहे. असं म्हणत अर्थसंकल्प फुटला म्हणणार्यांना अजित पवारांनी चोख उत्तर दिले.