बीड (रिपोर्टर): मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत उद्या होत असलेल्या भव्य रॅलीची जय्यत तयारी झाली. बीड शहरात ठिकठिकाणी मोठमोठे कटआऊट पहावयास मिळत असून रॅलीमध्ये सहभाग नोंदवणार्या चारही दिशातून येणार्या मराठ्यांच्या वाहनांसाठी वेगवेगळ्या 15 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. दुसरीकडे रॅलीसह सभेला परवानगी देण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले असून रॅलीच्या आयोजनकर्त्यांना तब्बल 40 सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश पोलिसांकडून देण्यात आले आहेत.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे राज्यभर दौरा करत असून रॅली आणि संवाद यात्रेच्या माध्यमातून ते प्रत्येक जिल्ह्यात जात आहेत. उद्या मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये मराठा समाजाची भव्य रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून माळीवेस, सुभाष रोड, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक, जालना रोड ते छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी निघणार आहे. त्यासाठी जय्यत तयारी झाल्याचे दिसून येत असून बीड शहरात मनोज जरांगे पाटील यांचे मोठमोठे कटआऊट सर्वत्र झळकताना दिसून येतात. जिल्हाभरातून येणार्या मराठ्यांच्या वाहनांची व्यवस्था वेगवेगळ्या पंधरा ठिकाणी करण्यात आली आहे. यामध्ये गेवराई, माजलगाव या भागातून येणार्या वाहनांसाठी सिद्धीविनायक कॉम्प्लेक्स परिसर, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल परिसर, रिलायन्स पेट्रोल पंप परिसर, मिनी बायपास परिसर या ठिकाणी पार्किंदगची व्यवस्था करण्यात आली तर परळी, माजलगाव, धारूर, वडवणी, अंबाजोगाई, केज आणि बीड या तालुक्यातून येणार्या वाहनांसाठी शासकीय रुग्णालयाच्या पाठिमागे बिंदुसरा रेस्ट हाऊस परिसर,माने कॉम्प्लेक्स परिसर, निळकंठेश्वर मंदिर परिसर, कंकालेश्वर मंदिर परिसर, बिंदुसरा नदी पात्र, खंडेश्वरी मंदिर, एमआयडीसी परिसर, फटाका मैदान, मोंढा रोड परिसर, तर आष्टी-पाटोदा-शिरूर या तालुक्यातून येणार्या वाहनांसाठी शासकीय आयटीआय परिसर, जुने व नवी पंचायत समिती परिसर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह परिसर आदी ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. पोलिसांनी संवाद सभेलाही परवानगी दिल्याचे सांगण्यात येते. उद्याच्या रॅलीकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागून आहे.