अंबाजोगाई (रिपोर्टर): शाळेची इमारत नसल्याने गेल्या दहा वर्षांपासून इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना झाडाखाली ज्ञानार्जन करावे लगात आहे. जेव्हा पाऊस पडतो, बाहेर चिखल होतो तेव्हा गावातील एक जण आपल्या स्वत:च्या राहत्या घरी मुलांची शाळा भरवण्यास परवानगी देतो. हे विदारक आणि शासन प्रशासन व्यवस्थेच्या डोळ्यात झनझनीत अंजन घालणारं चित्र अंबाजोगाईपासून सात कि.मी. पासून असलेल्या चनई तांडा येथील आहे. आतातरी विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करण्यासाठी इमारत बांधून द्यावी, अशी मागणी होत आहे.
अंबाजोगाईपासून काही अंतरावर असलेल्या चनई ग्रामपंचायत अंतर्गत चनई तांडा ही जवळपास शंभर लोकसंख्येची वस्ती आहे.या ठिकाणी जिल्हा परिषदेची पहिली ते पाचवीपर्यंत शाळा असून गेल्या दहा वर्षांपासून शासनाच्या वेळकाढू धोरण आणि दफ्तर दिरंगाईमुळे या ठिकाणी अद्याप इमारत नाही त्यामुळे शाळा एका लिंबाच्या झाडाखाली भरवली जाते. अनेक वेळा शाळेच्या इमारतीबाबत संबंधित शिक्षण विभागाला मागणी करूनही ती पुर्णत्वास जात नाही. जेव्हा पाऊस येतो तेव्हा बाहेर भरणारी शाळा नेमकी कुठे भरवायची? हा प्रश्न पडतो, मात्र गावातील आडे नावाचे गृहस्थ स्वत:चं घर शाळेसाठी वापरायला देतात. आडेंसारखी संवेदनशीलता याभागातील आमदार-खासदार, पुढार्यांना आणि शिक्षण विभागातील अधिकार्यांना आली तर ती अधिक बरी, अशी प्रतिक्रिया सर्वसामान्यातून व्यक्त होत आहे. या प्रकरणी इमारत तात्काळ उभी करावी, अशा आशयाची मागणी समाजसेवक डॉ. गणेश ढवळे यांनी केली आहे.