Saturday, October 23, 2021
No menu items!
Homeक्राईमऔरंगाबादमधील बनावट नोटांचा मास्टरमाइंड धारूरमध्ये पकडला

औरंगाबादमधील बनावट नोटांचा मास्टरमाइंड धारूरमध्ये पकडला


आतापर्यंत तीन लाखांच्या नोटा ताब्यात, आजच्या छाप्यात धारूरमधून सहा हजाराच्या नोटा जप्त, प्रिंटर, कॉम्प्युटरसह आदी साहित्य महा ईसेवा केंद्रातून हस्तगत, बीड जिल्ह्यात खळबळ
धारूर (रिपोर्टर)- औरंगाबादमध्ये ५००, २००, १० रुपयांच्या बनावट नोटांचा सुळसुळाट असल्याने बनावट नोटांप्रकरणी दोघा जणांना औरंगाबाद पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या बनावट नोटांचा मास्टरमाइंड धारूर तालुक्यातील आरणवाडीचा असल्याचे निष्पन्न झाले तेव्हा आज सकाळी औरंगाबाद पोलिसांनी धारूर शहरातील हनुमान चौक भागात असलेल्या महा ई सेवा केंद्रावर छापा मारून त्याठिकाणाहून ५००, २०० आणि १० रुपयांच्या ६ हजारापेक्षा जास्त रुपयांच्या नोटा पकडल्या. या वेळी बनावट नोटांचा मास्टरमाइंड आकाश संपत माने याच्या मुसक्या बांधण्यात आल्या असून दुकानामधून कलर प्रिंटरसह कॉम्प्युटर आणि आदी साहित्य जप्त केले आहे. या घटनेने बीड जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.

औरंगाबाद शहरासह जिल्ह्यातील काही भागात बनावट नोटांचा सुळसुळाट दिसून येत होता. औरंगाबाद पोलिसांनी ५००, २०० आणि १० रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणल्या प्रकरणी याआधी श्रीमंत आरगडे, निखील संदेहराव (बेगमपुरा) यांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून आतापर्यंत ३ लाख रुपयांपर्यंतच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या. पोलिसांच्या तपासात बनावट नोटांचा मास्टरमाइंड हा बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील आरणवाडीचा असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे औरंगाबाद पोलिस आरणवाडीच्या आकाश संपत माने या मास्टरमाइंडवर लक्ष ठेवून होते. आकाश माने याचे धारूर शहरातील हनुमान चौकात महा ईसेवा केंद्र आहे.  आज सकाळी औरंगाबाद पोलिसांनी या ईसेवा केंद्रावर छापा मारला. तेव्हा आकाश माने याच्या या दुकानामधून ५००, २०० आणि १० रुपयांच्या तब्बल ६ हजारपेक्षा जास्त रुपयांच्या नोटा मिळून आल्या. पोलिसांनी तेथील कलर प्रिंटर, कॉम्प्युटरसह बनावट नोटा बनवण्यासाठी लागलेले साहित्य जप्त केले असून बनावट नोटा बनवणारा मास्टरमाइंड आकाश माने याच्या मुसक्या आवळल्या आहेत. धारूरमध्ये बनावट नोटा तयार करण्यात येत असल्याची माहिती गेल्याने जिल्हाभरात खळबळ उडाली आहे. सदरील ही कारवाई सिडको पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय पवार, पो.हे.कॉ. पवार, सोनवणे, बन यांनी केली. या प्रकरणी आरोपीविरोधात कलम ४८९ (अ, ब, क) नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

Most Popular

error: Content is protected !!