बीड (रिपोर्टर): बीड पोलीस दलाकडून सध्या जिल्ह्यात ‘ हम करे सो कायदा अन् चोरा चिलटांना फायदा’ असे कामकाज सुरू असून दोन दिवसांपूर्वी गुन्हा अन्वेषण विभागाने दिंद्रुड परिसरात पकडलेल्या 75 लाख रुपयांच्या गुटख्या प्रकरणी मुख्य आरोपी विरोधात गुन्हा दाखल न करता जुन्या परंतु सध्या गुटखा विक्री बंद केलेल्या गुटखा माफियावर गुन्हा दाखल करून बीड पोलिसांनी पुन्हा एकदा ‘हम करे सो कायदा’चे वर्तन जिल्हावासियांसमोर मांडले आहे. ज्या गुटखा घेऊन जाणार्या ट्रक चालकाचा सीडीआर काढला आणि त्यावरील संपर्क पाहिले तर खरा गुटख्याचा मालक पोलिसांसमोर येईल, परंतु पोलिसांना त्या गुटख्याचा खरा मालक समोर आणायचा नाही हे तक्रार कोणी द्यायची यावरून दिंद्रुड पोलीस आणि गुन्हे अन्वेषण विभागात झालेल्या वादावादीतून दिसून येत आहे.
गेल्या दोन दिवसांपूर्वी दिंद्रुड पोलीस ठाण्याचे गुन्हा अन्वेषण विभागाचे शेख आणि त्यांच्या टीमने या परिसरात अवैधरित्या गुटखा घेऊन जाणारा एक ट्रक पकडला. त्या ट्रकमध्ये 75 लाखांपेक्षा जास्त रुपयांचा गुटखा असल्याचे समोर आले. सदरचा गुटखा कोणाचा याचा शोध पोलीस घेत असतानाच गुटख्याचा खरा मालक माहित असताना यात जाणीवपुर्वक जुन्या गुटखा माफियाला अडकवण्यात आल्याची जोरदार चर्चा होत आहे. सदरचा गुटखा पकडल्यानंतर याआधी जो गुटखा माफिया महारुद्र मुळे याच्यावर गुन्हे दाखल आहेत त्याचाच हाही गुटखा आहे, असे दाखवून मुळेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र वस्तूस्थितीनुसार मुळे याने गुटख्याचा धंदा गेल्या तीन-चार महिन्यापासून सोडून दिल्याचे बोलले जाते. मग असे असताना मुळेवरच गुन्हा दाखल करून पोलीस कुठल्या अन्य एका गुटखा माफियाला अभय देतात हा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे गुन्हा दाखल करताना गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस अधिकार्यांनी किंवा पथकातील कर्मचार्यांनी यात फिर्यादी व्हायला हवे होते, परंतु दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या ठाणेदाराला या ठिकाणी फिर्याद होण्यास भाग पाडल्याचे बोलले जाते. फिर्याद कोणी द्यायची? यावरून गुन्हे अन्वेषण विभाग आणि तेथील ठाणेदारात शाब्दीक चकमक झाल्याचे बोलले जात असून वरिष्ठांचा फोन आल्यानंतर ठाणेदारांनी बळजबरीने स्वत: फिर्याद दिल्याचे सांगितले जाते. या प्रकरणात मुळे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आणि खरा गुटखा मालक सोडून देण्यात बीड पोलिसांना इंट्रेस्ट काय? हा सवाल उपस्थित होत असताना ट्रक चालकाचा सीडीआर आणि त्या बारा तासामध्ये ट्रक चालकाने कोणा कोणा सोबत फोनवर चर्चा केली हे शोधलं तरीही गुटख्याचा खरा मालक सापडतो. हे सर्वसामान्यांना माहित असताना ते बीड पोलिसांना का कळत नाही? याचा उत्तर कोणाला तरी गुटख्याच्या केसमधून बाजुला ठेवायचं अन् नेहमीच ज्याच्यावर कारवाई हातेे त्याच्यावर कारवाई करून आपली पाठ थोपटून घ्यायची, असे धोरण बीड पोलिसांचे आहे.