बीड (रिपोर्टर): पंढरपूरहून वारी करत गावी परतणार्या वारकर्यांच्या टेम्पोचे टायर फुटल्याने झालेल्या अपघातात 25 वारकरी जखमी झाले. तर यात तीन महिला गंभीर असल्याचे सांगण्यात आले. सदरचा अपघात रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास बीड शहरानजीकच्या बायपासजवळ घडला. या घटनेची माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना झाल्यानंतर त्यांनी थेट बीड जिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर राऊत यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत जखमी वारकर्यांवर व्यवस्थीत उपचार करण्यासंदर्भात सूचना केल्या. यातील काही जखमींना संभाजीनगर येथे रेफर करण्यात आले आहे. जखमी हे देवीबाभुळगाव आणि कन्नड येथील असल्याचे सांगण्यात येते.
आषाढी एकादशीनिमित्त संभाजीनगर भागातील कन्नड आणि देवीबाभुळगाव येथील वारकरी माऊलींच्या दिंडीत गेले होते. काल ते वारी करून एका टेम्पोमध्ये परतत असताना रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास बीड शहरानजीक असलेल्या बायपासजवळ त्यांच्या टेम्पोचे टायर फुटले आणि टेम्पो पलटी झाला. यामध्ये प्रल्हाद तुकाराम वाणी, निवृत्ती गोपीनाथ करांडे, कडुबा शामराव मोकळे, मणिराम शंकर सोळुंके, मच्छिंद्र संतराम साळुंके, साहेबराव पांडुरंग बनकर, सुधाकर साळु सोळंके, सुकदेव कडू दुबाले, गणेश काशीराम मोकाटे (रा. देवीबाभुळगाव) यासह कन्नड येथील 15 पेक्षा अधिक महिला-पुरुष वारकरी यात जखमी झाले. जखमींना हायवे पोलीसचे चालक विकास काकडे व त्यांच्या टीमच्या माध्यमाने तात्काळ बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघाताची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना झाल्यानंतर त्यांनी रात्री नऊच्या सुमारसा बीड जिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर राऊत यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत जखमी वारकर्यांना व्यस्थित ट्रिटमेंट करण्याबाबत सूचना दिल्या.