बीड (रिपोर्टर): चोरट्यांच्या दहशतीने बीड शहरवासीय आधीच त्रस्त असताना रात्री बीड शहरातील बार्शी रोड वरील शिवसेना कार्यालयाच्या बाजुला असलेल्या अॅक्सीस बँकेचे एटीएम मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास एक चोरटा दगडाने फोडत असल्याचे पेट्रोलिंगवर असलेल्या शिवाजीनगर पोलिसांना दिसून आले. त्यावेळेस त्याला रंगेहात पकडले. सदरचा चोरटा हा पेंडगाव येथील असल्याचे सांगण्यात येते. मात्र तो वेडसर असल्याचेही बोलले जात असल्याने पोलीस तपास करत आहेत.
बीड शहरात मोठ्या प्रमाणावर चोरीच्या घटना घडत आहेत. शहरवासिय भीतीच्या वातावरणात रात्र जागून काढतात. अनेक ठिकाणी शहरातील नागरीकांनीच आपल्या गल्लीबोळांमध्ये आणि कॉलनींमध्ये गस्त सुरू केली आहे. एकीकडे चोरट्यांचे जुने व्हिडिओ ग्रुपवर टाकून भीतीच्या वातावरणात अधिक भर टाकली जात आहे तर दुसरीकडे चोरटे आपले काम दाखवत आहेत. मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास शिवाजीनगर पोलीस पेट्रोलिंगवर असताना बार्शी रोडवरील शिवसेना कार्यालयाच्या बाजुला अॅक्सीस बँकेचे एटीएम आहे ते दगडाने फोडण्याचा प्रयत्न पेंडगाव येथील अक्षय दिलीप गायकवाड हा करत होता. पोलिसांनी त्याला रंगेहात पकडले. तो वेडसर असल्याचेही सांगितले जात असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. एटीएममधील कॅश सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले.