गाई, म्हशी, शेळ्यांची चोरी वाढली
बीड, (रिपोर्टर)ः- बीड शहरासह जिल्हाभरामध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला. दररोज जिल्ह्यात चार पाच ठिकाणी चोरीच्या घटना घडू लागल्या. चोरटे सोन्या चांदीच्या दागिन्यासह नगदी रक्कम, मोटारसायकल, मोबाईल चोरी करत आहेत. मात्र आता चोरटे जनावरे ही चोरू लागले. शहरातील मोकाट जनावरांची चोरी होवू लागली. ग्रामीण भागात गोठ्यात बांधलेले जनावरे सर्रासपणे चोरीला जावू लागले. चर्हाटा येथील 4 बैल आणि 2 गाई अज्ञान चोरटयांनी चोरून नेले. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सध्या बीड जिल्ह्यात चोरट्याने धुमाकूळ घातला आहे. चोरट्यांचा बंदोबस्त करण्यात पोली प्रशासनाला अपयश येवू लागले. शहरासह ग्रामीण भागात वाढत्या चोरीच्या घटनेने नागरीकांसह व्यापार्यात भितीचे वातावरण निर्माण झाले. चोरटे आता जनावरेही चोरू लागले. शहरात अनेक मोकाट जनावरे असतात. हे जनावरे रात्रीच्या दरम्यान रस्त्यावर किंवा रस्त्याच्या बाजुला बसतात. चोरटे थेट टॅम्पो मध्ये घालून जनावरे चोरून नेत आहेत. यापुर्वी अनेक वेळा जनावरे चोरणार्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला होता. मात्र तरीही जनावरांची चोरी होतच आहे. ग्रामीण भागातही गोठ्यात बांधलेले जनावरे चोरीला जावू लागले. चर्हाटा येथील आण्णासाहेब हरिचंद्र उबाळे यांचे 4 बैल, 2 गाई चोरट्यांनी चोरून नेल्या. या जनावरांची किंमत 1 लाख 53 हजार एवढी आहे. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.