विशाळगड/बीड (रिपोर्टर): विशाळगडावर झालेल्या हिंसाचारानंतर राज्यभरात मुस्लिम समाजात संतापाची लाट उसळली आणि मुस्लिमांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह बीड जिल्ह्याचे सुपुत्र जमियत उलमाये हिंदचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हाफीज नदीम सिद्धीकी यांनी विशाळगडाकडे धाव घेतली. काल त्यांनी हिंसारग्रस्त भागातील पिडितांसोबत चर्चा केली. अजित पवारांनी सरकार तुमच्या सोबत असल्याचे सांगत ज्या लोकांनी हा आतेताईपणा केला त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले तर नदीम सिद्धीकी यांनी उपस्थित नागरिकांना धीर देत अवघा महाराष्ट्र तुमच्यासोबत असल्याचे सांगितले.
तीन दिवसांपूर्वी विशाळगडाच्या पायथ्याशी काही असामाजिक तत्वाच्या लोकांनी मुसलमानवाडी आणि गजापूर येथील मुस्लिम समाजाच्या घरांवर दगडफेक करत प्रचंड प्रमाणात मोडतोड केली. तेथील मस्जिदचीही तोडफोड करण्यात आली. अतिक्रमण काढण्याच्या नावाने धर्मांधांनी हा हैदोस घातला. याचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटत असून प्रशासनाच्या उपस्थितीत सर्व प्रकार घडल्याने शासन-प्रशासन व्यवस्थे विरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गांभीर्याने घेत काल सायंकाळी ते थेट विशाळगडाच्या पायथ्याशी गेले. बीड जिल्ह्यातील मूळचे पात्रूड येथील जमियत उलमाये हिंदचे महाराष्ट्र अध्यक्ष हाफीज नदीम सिद्धीकी हेही अजित पवारांसोबत होते. तेथील पिडितांनी अजितदादांना आपबिती सांगितली. त्या दिवशीचा तो थरारक प्रकार ऐकल्यानंतर अजित पवारांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले तर हाफीज नदीम सिद्धीकी यांनी पिडितांना धीर देत अवघा महाराष्ट्र नव्हे देश तुमच्या सोबत असल्याचे सांगितले.