मुदतठेवची रक्कम परत दिली नाही
30 लाख 26 हजाराची केली फसवणुक
बीड (रिपोर्टर): बीड जिल्ह्यातील ज्ञानराधा, साईराम यासह अन्य काही मल्टिस्टेट दिवाळखोरीत निघाल्या. यामुळे खातेदार चांगलेच अडचणीत निघाले. पैशासाठी खातेदार बँकांच्या दारात दररोज जावून बसतात मात्र त्यांना पैसे मिळत नाहीत. बीड शहरातील साईराम बँकेच्या अध्यक्षासह चौघा जणांवर गुन्हा दाखल झाला. मुदतठेवची रक्कम वेळेवर दिली नसल्याने साईराम परभणे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारदाराची 30 लाख 26 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.
शहरातील पांगरी रोड परिसरात राहणार्या योगेश हनुमान गव्हाणे यांनी काही महिन्यांसाठी साईराम मल्टिस्टेटमध्ये रक्कम ठेवली होती. या रकमेची मुदत संपून सदरील ही रक्कम 30 लाख 26 हजार 671 रुपये झाली. पैशासंदर्भात ते वेळोवेळी बँकेमध्ये जात असते. मात्र त्यांना पैसे मिळत नाहीत. साईराम मल्टिस्टेट बँक ही दिवाळखोरीत निघाल्याने ती बंद करण्यात आली. आपले पैसे मिळत नसल्याने गव्हाणे यांनी शिवाजीनगर ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. त्यानुसार अध्यक्ष शाहीनाथ विक्रम परभणे, साधना शाईनाथ परभणे, मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक शाईनाथ परभणी, व्यवस्थापक बनकर यांच्या विरोधात कलम 318 (4), 316 (2), 316 (5), 336 (2), 338, 340 (2) भा.दं.वि.नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.