चर्मकार महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी
कार्यालयासमोर आमरण उपोषण
बीड (रिपोर्टर): आनंद महिंद्रा यांच्या विरोधात नेकनूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होऊनही त्यांना अटक करण्यात येत नसल्याने त्यांच्या अटकेसाठी सखाराम शिंदे हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत तर चर्मकार महासंघाच्या वतीने विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू आहे.
सखाराम नामदेव शिंदे (रा. शिवणी) यांनी काही महिन्यांपूर्वी महिंद्रा कंपनीची गाडी घेतली होती मात्र या गाडीमध्ये फॉल्ट निघाला. याबाबत त्यांनी अनेक वेळा तक्रार करूनही त्यांना नुकसानभरपाई देण्यात आली नाही. शिंदे यांनी आनंद महिंद्रा यांच्या विरोधात नेकनूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार गुन्हाही दाखल झाला होता. मात्र त्यांना अटक झाली नाही. त्यांच्या अटकेसाठी सखाराम शिंदे हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत. दुसरे आंदोलन चर्मकार महासंघाच्या वतीने करण्यात येत आहे. राज्य सरकार चर्मकार महासंघाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहेत. आपल्या विविध मागण्यांसाठी चर्मकार महासंघाच्या वतीने उपोषण सुरू आहे. या वेळी अनेकांची उपस्थिती होती.