बीड (रिपोर्टर): केंद्र आणि राज्य सरकारची एकूण धोरणे लक्षात घेता जिल्हा, तालुका, गाव पातळीवरील छोटी वृत्तपत्रे आणि पत्रकार ही व्यवस्था कमजोर करण्याची राहिली आहे. समाजातील विविध व्यवसायिक, नोकरदार, तरुण, महिला या घटकांना न्याय देताना पत्रकारांच्या मागण्यांकडे मात्र दुर्लक्ष केले जाते. सरकार मतपेटीचा विचार करून हजारो कोटींच्या घोषणा करते, मात्र सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम करणार्या पत्रकारांचेच प्रश्न पाठपुरावा करूनही सुटत नाहीत. पत्रकारही समाजातील प्रमुख घटक आहे याची आठवण करून देण्यासाठी संवाद यात्रा होणार आहे. संवाद ही नैसर्गिक प्रक्रिया असून ती थेट वैयक्तिक आणि संस्थात्मक परिवर्तन घडवते. यात्रा पत्रकारांचे प्रश्न सरकारला सांगण्यासाठी आणि पत्रकारांना समजून घेण्यासाठी संधी प्रदान करणार आहे. 28 जुलैपासून दीक्षा भूमीतून यात्रेला सुरुवात होणार असल्याची माहिती पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी दिली.
ते आज आयोजीत पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. या पत्रकार परिषदेला ज्येष्ठ संपादक राजेंद्र आगवान, सुनील क्षीरसागर, संतोष मानूरकर, माणुसमारे यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना वसंत मुंडे म्हणाले की, पत्रकारांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात आहे. शासन दरबारी पत्रकारांचे प्रश्न मांडण्यासाठी ही संवाद यात्रा आयोजीत करण्यात आलेली आहे. ज्या या संवाद यात्रेमध्ये सहभागी व्हायचे आहे त्यांनी या यात्रेत सहभागी होऊन लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी आणि पत्रकारांच्या न्याय -हक्कासाठी आयोजीत करण्यात आल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.