परळी (रिपोर्टर): परळी शहरासह मतदारसंघाला मी चांगला ओळखतो, परिचीत आहे, याठिकाणी पंचायत समिती, जिल्हा परिषदसाठी मी याआधीही काम केलेले आहे. येणार्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून आपल्याला उमेदवारी देण्यात आली तर आपण निवडणूक लढवणार असल्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी म्हटले.
ते आज परळी येथे पत्रकारांशी बोलत होते. या वेळी काँग्रेसचे महत्वाचे पदाधिकारी उपस्थित होते. महाविकास आघाडीकडून जो उमेदवार येईल त्या उमेदवाराला निवडून आणू. महाविकास आघाडीमधील सर्व पक्ष या मतदारसंघात विश्वासाने काम करत आहेत. मोठ्या ताकतीने येणार्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी उतरणार असल्याचे सांगून आपणही या मतदारसंघात निवडणूक लढवण्याबाबत इच्छुक असल्याचे देशमुख यांनी म्हटले. पंचायत समितीचा सभापती झाल्यापासून मी या मतदारसंघामध्ये काम करत आहे. 1997 ला काँग्रेसला घवघवीत यश मिळवून दिलं. त्यावेळेस काँग्रेसच्या आठ जागा निवडून आल्या. मी तेव्हा गटनेता होतो. 1998 ला अंबाजोगाई तालुक्यात पंचायत समितीत उपसभापती होतो. परळी मतदारसंघामध्ये मी काही नवीन नाही. गेल्या तीन दशकांपासून या मतदारसंघामध्ये मी काम करत आहे. या मतदारसंघामध्ये मी इच्छूक म्हणण्यापेक्षा निवडणूकच लढणार असल्याचे राजेसाहेब देशमुख यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटले.