Sunday, October 17, 2021
No menu items!
Homeबीडप्रत्येक शाळेत डिसले गुरुजी दिसावे!!

प्रत्येक शाळेत डिसले गुरुजी दिसावे!!

प्रत्येक शाळेत डिसले गुरुजी दिसावे!!
मजीद शेख
जिल्हा परिषदेच्या शिक्षकाबाबत नेहमीच नकारात्मक सुर असतो. जि.प.चे शिक्षक कामचुकार, आळसी, शिकवत नाही. शाळेवर जात नाही. रिकामे कुटाणे करत असतात. यासह अन्य काही-बाही आरोप जि.प. शाळांवर होत असतात. काही प्रमाणात असे शिक्षक असतीलही, मात्र चांगले शिक्षक आहेत हे नाकारुन चालणार नाही. कित्येक शिक्षक अगदी तळमळीने शाळांवर जावून मुलांना शिकवतात. शाळांची देखभाल करतात. मुलं आणण्यापासून ते त्यांना घरी सोडण्यापर्यंतची जबाबदारी घेतात.

जिल्हा परिषद शाळा ह्या पुर्वीपासूनच मागास शाळा म्हणुन ओळखल्या जातात. जि.प. शाळांच्या विकासासाठी तितका प्रयत्न ना शासन करतं ना, गावकरी त्यामुळे जि.प.च्या शाळांवर वाईट दिवस आले. ज्या शिक्षकांना शिक्षणाबाबत खरी तळमळ आहे ते शिक्षक जीव तोडून शाळा आणि मुलासाठी काम करत असतात. सोलापूरच्या परितेवाडी येथील जिल्हा परिषदेचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी क्रांतीच केली. शिक्षणातील त्यांच्या कार्याबद्दल त्यांना ‘लंडनच्या वार्की फाउंडेशनने’ मानाचा ‘ग्लोबल टीचर’ हा पुरस्कार दिला. हा पुरस्कार सात कोटी रुपयाचा आहे. डिसले यांनी अभ्यासक्रमात ‘क्युआर कोडची निर्मीती केली. याची दखल घेवून त्यांना लंडनच्या वार्की फाऊंडेशनचे पुरस्कार दिला. या पुरस्कारामुळे देशाची मान जागतीक पातळीवर उंचालली. विशेष करुन जिल्हा परिषद शाळांची उंची वाढली.

जि.प. शाळेमध्ये डिसले सारखे शिक्षक असू शकतात हे सिध्द झालं. उठ-सुठ जि.प. शाळांच्या नावाने बोटे मोडणारांसाठी हा खुप मोठा आश्‍चर्याचा धक्का आहे. कुठलंही काम करायचं म्हटलं तर त्यासाठी स्वत: झोकून द्यावं लागतं. परिश्रम करावे लागतात. तेव्हा कुठं यश मिळतं.

डिसले सर यांची मेहनत अनेक वर्षापासूनची होती, ते ज्या शाळेवर कार्यरत होते, तेथे मुलं येत नव्हते, त्या मुलांना शिक्षणाची गोडी लावण्यापासून ते त्यांना शाळात आणण्यासाठी प्रचंड परिश्रम करावे लागले. मुलासाठी आणि शाळासाठी काही तरी करायचं हा ध्यास त्यांनी बाळगला आणि नवा इतिहास लिहला. आजचं युग हे तंत्रज्ञानाचं आहे. त्यामुळे त्याच पध्दतीचं शिक्षण मुलांना देण्याची गरज आहे, ही नस डिसले गुरुजी यांनी ओळखली, त्यांनी मुलांच्या अभ्यासक्रमात क्युआर कोडची निर्मीती करुन मुलांना घरीच अभ्यास करता यावा अशी पध्दत विकसीत केली. याचा फायदा कित्येक मुलांना झाला. डिसले यांच्या कार्यामुळे शाळेसाठी काम करणारांची उमेद वाढली.

ग्रामीण भागातील शाळांचा अपप्रचार झाल्याने कित्येक पालकांनी आपल्या पाल्यांना पुढील शिक्षणासाठी शहराच्या ठिकाणी पाठवलेले आहे. मुलांच्या भविष्याचा विचार करुन आपले पालक मुलांना इतर शाळांत प्रवेश देतात. मात्र आपल्या गावातील शाळाकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करणं हे ही तितकचं चुकीचं आहे. शाळाकडे केवळ राजकारण म्हणुन पाहणारे काही कमी नाहीत. शाळात एखादी वस्तू कमी पडली तर ती उपलब्ध करुन देण्याचं दायित्व गावातील गाव पुढारी दाखवत नाही, मात्र शाळा बांधकाम असेल किंवा शाळासाठी अन्य कुठले अनुदान आले असेल तर त्यावर मात्र अनेकांचा डोळा असतो, ही लाजीरवाणी बाब आहे. व्यवस्थापन समितीच्या निवडीसाठी भांडणे करणारे गावकरी काही कमी नाहीत.

यावरुन त्यांची शिक्षणाबद्दलची तळमळ उघडी पडते. पदासाठी भांडणे करणारांना किती शिक्षणाबद्दल गोडी आणि अभ्यास आहे हे दिसतं? ज्या शाळामध्ये आपली मुलं शिक्षण घेतात. त्या शाळेबद्दल आदर व्यक्त करुन तेथील शिक्षकांना बळ देण्याचं काम झालं पाहिजे. अनेक गावातील लोक शाळात राजकारण करुन शिक्षकांच्या बदलीसाठी आंदोलन करत असतात. शाळेला कुलूप ठोकत असतात.

अशा प्रकारातून शाळेचीच बदनामी होते. गावातील एकी बरचं काही चांगलं करुन शकते. जि.प.चा शिक्षक हा नेहमीच नकारात्मक भुमिकेत दाखवण्याचा प्रयत्न झाला. जसा मराठी चित्रपटाने पाटील बदनाम केला, तसाच प्रकार शिक्षकांच्या बाबतीत झाला. गाव पुढारी असेल किंवा तालुका पातळीवर पुढारी शिक्षकाकडे तितक्या चांगल्या भावनेने पाहण्यास तयार नसतात. राजकरणातील काही जण शिक्षकांना ‘घरगडी’ समजतात, तसा त्यांचा वापर करत असतात. शिक्षक हा देशाचं भविष्य घडवणारा आहे. मात्र शिक्षण प्रणाली बदनाम होण्यास शासन,प्रशासन तितकचं जबाबदार आहे. शिक्षकांना शाळे व्यतिरिक्त इतर कामे करण्यास भाग पाडले जाते.

शाळांच्या नवीन इमारती बांधल्या जात नाही. शाळामध्ये सुविधा दिल्या जात नाही. त्यामुळे शिक्षकांचा शाळेवरील इंट्रेस कमी होतो. आजच्या युगात मुलांना चांगले आणि दर्जेदार शिक्षण मिळणे गरजेचे आहे. डिसले गुरुजी यांनी नव्या शिक्षण पध्दतीला जन्म घालून एक आदर्श निर्माण केला आहे. यांच्या कार्याची कदर व्हायला हवी आणि आपल्या जि.प.शाळा बाबत आणि शिक्षका बाबत चांगली भावना निर्माण करुन त्यांना पाठबळ देण्याचे काम झालं तर नक्कीच डिसेल गुरुजी सारखे शिक्षक प्रत्येक गाव पातळीवर दिसतील.

Most Popular

error: Content is protected !!