गेवराई (रिपोर्टर) दिव्यांग बंधू भगिनींच्या बाबतीत नुसती सहानुभूती दाखवून उपयोग नाही तर त्यांच्या क्षमता ओळखून त्यांना संधी दिली तर ते सक्षमपणे काम करतील्, त्यासाठीच शारदा प्रतिष्ठान आणि साधु वासवाणी मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कृत्रिम हात व पाय शिबीराचे आयोजन करून दिव्यांग बांधवांना संधी देण्याचे काम करत असल्याचे प्रतिपादन शारदा प्रतिष्ठानचे कार्यवाह अमरसिंह पंडित यांनी केले. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या मोफत कृत्रिम हात व पाय शिबीराचे उद्घाटन करताना ते बोलत होते.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शारदा प्रतिष्ठान, गेवराई आणि साधु वासवाणी मिशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने गेवराई शहरात मोफत कृत्रिम हात व पाय शिबीराचे आयोजन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर शारदा प्रतिष्ठानचे कार्यवाह अमरसिंह पंडित, बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित
साधु वासवाणी मिशनचे प्रोजेक्ट हेड मिलींद जाधव, डॉ. सुशिल ढगे, डॉ. सलील जैन, प्रतिष्ठानचे सचिव भाऊसाहेब नाटकर, सभापती मुजीब पठाण, माजी सभापती कुमारराव ढाकणे, जगन काळे, जगन्नाथ शिंदे, बाबुराव काकडे, रिपाईचे किशोर कांडेकर, सावता परिषदेचे दादासाहेब चौधरी, शामकाका येवले, रणवीर पंडित आदी मान्यवर उपस्थित होते.
आपल्या भाषणात बोलताना अमरसिंह पंडित म्हणाले की, मागील दोन वर्षा पासून शारदा प्रतिष्ठान कडून हे शिबीर आयोजित करण्यात येत आहे. मागच्या शिबिरातून आपण 276 दिव्यांगाना कृत्रिम हात व पाय वाटप केले. या शिबिरातून जास्तीत जास्त दिव्यांगांना आधार दिला जाईल. ग्रामीण भागातील वाचन संस्कृती जोपासण्यासाठी वाचनालय आणि मुलींच्या शिक्षणासाठी वसतिगृहाची निर्मिती करण्यासाठी साधु वासवानी मिशनने सहकार्य करण्याचे आवाहन करुन भविष्यात अशा शिबीरांचे नियमीत आयोजन करणार असल्याचे अमरसिंह पंडित यांनी त्यांच्या भाषणात सांगितले.
यावेळी बोलताना साधु वासवाणी मिशनच्या वतीने डॉ. सुशिल ढगे यांनी शिबीराच्या आयोजना बाबत अमरसिंह पंडित यांचे आभार व्यक्त केले. शिबिरात 350 पेक्षा जास्त पात्र दिव्यांगांच्या अवयवाचे मोजमाप घेण्यात आले. पुढील महिण्यात त्यांना कृत्रिम हात व पायाचे वाटप केले जाणार आहे. कार्यक्रमाचे सुत्र संचलन माधव चाटे यांनी केले तर आभार भाऊसाहेब नाटकर यांनी मानले. कार्यक्रमाला दिव्यांगांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिव्यांगाना आधार देण्याचे काम शिवछत्र परिवार करत आहे – सुषमा वाघ
दिव्यांगा साठी गेवराई सारख्या ग्रामीण भागात अमरसिंह पंडित यांनी शिबीर घेऊन मोठा आधार दिला आहे. दिव्यांग बांधवांबरोबरच शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सांस्कृतिक, वक्तृत्व, क्रीडा अशा विविध क्षेत्रात शिवछत्र परिवार करत आहे. सर्वांना सोबत घेऊन चालणा-या शिवछत्र परिवाराला आपण सहकार्य करण्याचे आवाहन दिव्यांग प्रतिनिधी सुषमा वाघ यांनी यावेळी केले.