बीड (रिपोर्यर): बीड बसस्थानकामध्ये गेल्या काही महिन्यांपासून चोर्यांचे सत्र सुरू आहे. या ठिकाणी ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचार्यांना चोरांना अटकाव आणण्यात अपयश येत आहे. चोरटे आणि पोलीस यांच्यात संगनमत आहे की काय? असा प्रश्नही निर्माण होऊ लागलाय. आज सकाळी बसमध्ये चढत असताना एका प्रवाश्याची दोन तोळ्याची चैन आणि पॉकेट चोरून नेले. या प्रकरणी दुपारपर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.
बीड बसस्थानकामध्ये दररोज अनेक प्रवाशांची ये जा असते. गर्दीचा फायदा उचलून चोरटे खिशातील पैसे, मोबाईल, सोन्याचे दागिने चोरून नेतात. चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असताना सदरील चोरट्यांविरोधात कुठलीही कारवाई होत नाही. चोरट्यांशी तेथील पोलीस कर्मचार्यांचे संगनमत आहे का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय. आज सकाळी पाटोदा-परळी बसमध्ये चढत असताना एका प्रवाश्याच्या गळ्यातील दोन तोळ्याची चौन आणि खिशातील पॉकेट चोरट्यांनी पसार केले. आपली चैन चोरल्याचे प्रवाश्याच्या निदर्शनास आल्यानंतर त्याने आरडाओरड केली मात्र त्याचा काही फायदा झाला नाही. या प्रकरणी दुपारपर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.
बसस्टँडवर गाड्यांचा अवमेळ
गेल्या दोन महिन्यांपासून बीड बसस्थानकाचे बांधकाम सुरू असल्यापासून कोणत्याच गाड्या वेळेवर सुटत नाहीत. अनेक गाड्या रद्द केलेल्या असतात. कधीच एकाच वेळेस पाच-पाच गाड्यांचे टायर पंक्चर झालेले असते तर कधी या गाड्या यात्रेला गेलेल्या असतात. मोटार मेकॅनिक पासून ते विभाग नियंत्रकापर्यंत कोणालाच याचे सोयरसुतक नसते. कुठल्याच बसला कुठल्या गावाला गाडी जात आहे याची नेमप्लेट नसते त्यामुळे प्रवाशात गोंधळ उडतो. या ठिकाणावरून ग्रामीण भागात प्रवास करणार्या नोकरांचे विशेष करून महिला नोकरदारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे इथून पुढे तरी बसस्थानक प्रशासनाने गाड्या वेळेवर सोडावेत अणि गाड्यांना नेमप्लेट बसवावे, अशी मागणी होत आहे.