गणेश सावंत
पेशव्यांच्या शनिवारवाड्यात आजही नारायणरावांची ती किंकाळी काका मला वाचवा, ही ऐकू येते म्हणे, ती सत्य की असत्य परंतू सत्ताकारणातून ज्या पद्धतीने नारायणरावांची निघृण हत्या झाली त्याच पद्धतीने सत्ताकारणासाठी आजही महाराष्ट्राच्या राजकारणात काका-पुतण्यांच्या वादाची चिंगारी जिथे तिथे भडकलेली दिसतेय. मग बाळ ठाकरे-राज ठाकरे असतील, शरद पवार-अजीत पवार, गोपीनाथ मुंडे-धनंजय मुंडे, अशोक पाटील निलंगेकर-संभाजी पाटील निलंगेकर, सुनिल तटकरे-अवधुत तटकरे, उदयनराजे भोसले-अभयसिंहराजे भोसले हे झाले. वरच्या राजकीय पठडीतले काका-पुतणे इथे बीडमध्येही काका-पुतण्याच्या चिंगारीने अनेकवेळा भडका उडवून दिला, मग तो अमरसिंह पंडित-बदामराव पंडितांचा असेल की, धनंजय मुंडे-गोपीनाथ मुंडेंचा असेल, आत्ता आत्ताचाच पहायचा असेल तर जयदत्त क्षीरसागर-संदीप क्षीरसागरांचा काका पुतण्यातील संघर्ष आणि जयदत्त क्षीरसागर-योगेश क्षीरसागर या दुसर्या पुतण्यातला क्षीरसागरांचा संघर्ष याची डोळा याचीदेहा उभ्या महाराष्ट्राने पाहितल्यानंतर आजही सत्ताकारणाच्या गणितात कुठे काका मला वाचवाच्या म्हणण्यापेक्षा काकांवरच पुतण्यापासून वाचवाच्या किंकाळ्या सातत्याने ऐकावयास आल्या आहेत. परंतू काल परवा बीड जिल्ह्यात एका काकाने सत्ताकारणाच्या या बाजारात स्वत: रिटायर्ड होत पुतण्याला समोर केले, तेव्हा खरंच आता काकांपासून पुतण्यांना संरक्षण मिळतं की राज्यात पुतणा राज्य आहे म्हणजेच पुतणा मावशीचं हे प्रेम तर नव्हे? हे प्रश्न पुन्हा एकदा सोळंकेंच्या गृहकलहातून उपस्थित होतात.
महाराष्ट्राला आणि बीड जिल्ह्याला काका पुतण्याचं राजकारण नवं नाही. राज्याच्या राजकारणात पुतण्यांना किती यश आलं हे सांगणं कठीण असलं तरी बीड जिल्ह्याच्या काका पुतण्याच्या राजकारणात पुतणे सरस ठरले हे मात्र खरे. बाळ ठाकरे-राज ठाकरेंचं काका पुतण्यातील राजकीय वैर आणि आत्ता आत्ता शरद पवार-अजित पवारांचं राजकीय वैर हे तोला मापाचं राहिलं परंतू बीड जिल्ह्यात जेव्हा जेव्हा पुतण्यांनी बंड पुकारलं तेव्हा तेव्हा काकाला पराभवाचा बुक्का माथी लावावा लागला. राजकारणातलं थोरलं घर म्हणून ज्या क्षीरसागरांपासून पंडीत-सोळंके आणि थेट मुंडेंच्या घरापर्यंत पाहितलं जातं, तिथं अनेकवेळा काका-पुतण्याचं प्रेम उतूही आलं आणि खळखळ उकळलंही, जेव्हा राजकारणातले भिष्म शिवाजीराव पंडीत विरूद्ध त्यांचे बंधू बदामराव पंडित यांच्यात राजकीय हाड वैर होतं तेव्हा पुतणे अमरसिंहांनी बदामरावांना आव्हान देत पुतण्या सरस असल्याचं दाखवून दिलं. इकडे गोपीनाथरावांच्या सोबत राहणारे धनंजय मुंडे यांच्यातही जेव्हा वाद झाला तेव्हा धनंजय मुंडेंनीही आपलं कर्तृत्व सिद्ध करत विरोधी पक्षापर्यंत मजल मारली तर गेल्या पाच वर्षांपूर्वी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांना त्यांचे पुतणे संदीप क्षीरसागरांनी आव्हान देत विधानसभेच्या निवडणूकीत त्यांना चितपट केले. त्यामुळे बीड जिल्ह्याच्या राजकारणात काकावर पुतण्या भारी ठरला. इकडे मात्र माजलगावात बंडाचं निशाण हाती घेवून घराच्या चौकटीवर असलेला पुतण्या जयसिंह सोळंके हे लाल निशाण दाखवण्याअगोदर काका प्रकाश सोळंकेंनी निर्णय घेतला. आजपर्यंत मला जेवढं प्रेम दिलं तेवढं जयसिंहभैय्यांना प्रेम द्या असे आवाहन मतदारसंघातील आपल्या समर्थकांना केलं. अन् सत्ताकारणाच्या या काका-पुतण्यातील किंकाळ्यांना पुर्णविराम देत काका पुतण्यासाठी राजकीय गादी देवू शकतो हे दाखवून दिलं. प्रकाश सोळंकेंचा हा निर्णय राजकीय अपरिहार्यता होती का? या प्रश्नाचं उत्तर मी जरी देत नसलो तरी कटाक्ष मात्र ते उत्तर शोधून राहतं अन् आजच प्रकाश सोळंके यांच्या सुनबाईची सोशलमिडियावर पोस्ट पडतेे. त्या पोस्टमधल्या शेवटच्या दोन ओळी अशा असतात-‘जेव्हा सुरक्षित, ठाम, सर्वव्यापी, आत्मविश्वासपूर्ण, मुळ, मजबूत असणारं नेतृत्वं समाजाला मिळतं तेव्हा खरा उभा राहतो, नेतृत्वरुपी सह्याद्री, योग्य नेतृत्व निवडा, माझा जनतेला प्रश्न आहे, तरीही तुतारी वाजणार का?’ यातून प्रकाश सोळंकेंनी पुतण्याबद्दल दाखवलेलं दातृत्व आणि हे दातृत्व दाखवताना थेट शरद पवारांवर केलेली टिका, त्या टिकेला तर हे उत्तर नव्हे, काल प्रकाश सोळंके म्हणाले होते राजकारणात मोठ्यानं कुठं थांबायचं हे ठरवलं पाहिजे. शरद पवारांनीसुद्धा वेळीच थांबायला पाहिजे होतं. सोळंकेंच्या या वक्तव्यावर त्यांच्या सुनाकडून ‘नेतृत्वरुपी सह्याद्री’ हा वाक्य प्रयोग प्रकाश सोळंकेंच्या निवृत्तीला आणि राजकीय वारसाच्या घोषणेत पुतणाप्रेम दाखवणारं तर नव्हे? काही असो बीड जिल्ह्यात अन्य काका पुतण्यात वाद झाले, पुतणे काहीसे सरस ठरले, माजलगावच्या काकांनी मात्र निवृत्तीचे धडे काकांनाच दिले.