मुंबई (रिपोर्टर): बीडमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या गाडीवर सुपार्या फेकण्यात आल्या. या आंदोलनात शिवसेनेचे कार्यकर्ते असतील, पण त्या आंदोलनाशी पक्षाचा संबंध नाही असं शिवसेना उद्धव बाळासाहेबव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. मात्र मनसेने आम्हाला इशारे वगैरे देऊ नये असंही त्यांनी सुनावले आहे. महाराष्ट्राच्या गादीवर लोटांगणवीर बसले आहेत, असे म्हणत राऊतांनी टीका केली आहे. राऊत मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या गाडीवर काही जणांनी सुपारी फेकल्या त्यामध्ये शिवसेनेचे पदाधिकारी असू शकतात . पण त्या आंदोलनाशी शिवसेनेचा पक्ष म्हणून संबंध नाही.मराठा कार्यकर्त्यांचे आरक्षणासंदर्भातील ते आंदोलन होते. सध्या महाराष्ट्रात विशेषत: मराठवाडा आणि बीडमध्ये जे आंदोलन सुरू आहे. त्यात राज ठाकरे यांनी एक वक्तव्य केले. त्या वक्तव्यानंतर सर्वच पक्षातील तरुण मराठा कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. त्यात मनसेचे लोकही असू शकतात. कारण मराठा आंदोलन हे पक्षविरहीत आंदोलन आहे. जेव्हा या संदर्भात एक मराठा लाख मराठा असे म्हणते मोठमोठे मोर्चे निघाले. तेव्हाचे आमचे मंत्री, आमच्याच नाही तर इतर पक्षांचे नेते सगळे एकत्र होते. आता सुद्धा या आंदोलनामध्ये कदाचीत बीडला शिवसेनेची ताकद जास्त असेल त्यामुळे शिवसेनेचे कार्यकर्ते पुढे दिसले असतील. परंतु ते सर्वांचे आंदोलन होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, आम्हाला इशारे वगैरे देऊ नका, ते भाजपाला, फडणविसांना, महाराष्ट्र द्रोह्यांना द्या, मी माझ्या पक्षाची, पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भूमिका सांगत आहे. बीडमधला प्रकार घडला तेव्हा आम्ही दिल्लीत होतो, बातमी समोर आल्यानंतर आम्ही लगेच माहिती घेतली.