पोलिसांना ड्रोनची माहिती, परंतु घटनाक्रमाबाबत अनभिज्ञ
गेवराई (रिपोर्टर): मराठा आंदोलनासह विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने संवेदनशील असलेल्या गेवराई तालुक्यात पंचेवीस ते तीस गावांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून रात्रीच्या वेळेत ड्रोनने पाळत ठेवली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस येत असून गेवराई शहरातील नवीन वसाहतीतल्या घरांवरही गेल्या दहा पंधरा दिवसांपासून एक ड्रोन घिरट्या घालून पाळत ठेवत असल्याचे सांगण्यात येते. ही माहिती पोलीस यंत्रणेकडेही आहे. त्यांनीही याबाबत वरिष्ठांना माहिती दिल्याचे बोलले जाते. मात्र गेल्या आठ-पंधरा दिवसांपासून हे ड्रोन घिरट्या घालत असताना पोलिसांना मात्र हा कसला प्रकार आहे हे सांगता आले नाही. पाळत ठेवून चोरटे चोरीसाठी याचा वापर करतायत की, अन्य कुठल्या गंभीर प्रकरणाचा हा कळीचा दोरा आहे यावर उलटसुलट चर्चा होत असून नागरिकांतही भीतीचे वातावरण आहे.
गेवराई तालुका हा मराठा आरक्षणाच्या आणि आंदोलनाच्या प्रभावाखाली आहे. त्यामुळे या तालुक्यात ड्रोनने पाळत ठेवली जात असल्याने ती का ठेवली जाते? यावर उलटसुलट चर्चा होऊन नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. गेवराई शहरासह ग्रामीण भागातील उमापूर, धोंडराई, भोजगाव, तळणेवाडी, बेलगाव, तलवाडा, गोविंदवाडी, बेलगुळवाडी, चव्हाणवाडी, गंगावाडी, जातेगाव, गडी, तळेवाडी, राक्षसभुवन, पांचाळेश्वर, सावळेश्वर, राजपिंप्री, पांढरवाडी, मन्यारवाडी यासह या गोदा पट्टट्यातील अन्य वस्तींवर घरावरून मध्यरात्री ड्रोन घिरट्या गालतं, अनेकांनी त्याचे व्हिडिओही बनवले आहेत. मग चोरटे ड्रोन द्वारे पाळत ठेवतात की, अन्य कसला प्रकार आहे. याबाबत पोलिसांना माहिती असून पोलिसांनी त्याबाबत वरिष्ठांना माहिती दिली खरी माि हा प्रकार काय? हे मात्र अद्याप उघडकीस आले नाही. मराठा आरक्षण आणि आंदोलनाच्या प्रभावाखाली गेवराई तालुका आहे, त्यात चोरीच्या घटनाही सातत्याने वाढत आहेत. अशा स्थितीत ड्रोनद्वारे पाळत ठेवली जात असल्याने आणि त्याचे कारण स्पष्ट होत नसल्याने ग्रामीण भागात भीतीचे वातावरण आहे.