बीड (रिपोर्टर): मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता येत्या दोन दिवसात महिलांना मिळण्याची शक्यता असतानाच राज्यभरातील सुमारे 27 लाख महिलांच्या बँक खात्याशी आधार कार्ड लिंक नसल्याचे समोर आले आहे. बीड जिल्ह्यातही हजारो महिलांच्या बँक खात्याशी आधारकार्ड लींक नाही. या योजनेचे पैसे मिळवण्यासाठी बँक खात्याशी आधारकार्ड लिंक असणे अनिवार्य असल्याने ज्या महिलांचे आधारकार्ड लींक नाहीत त्यांना योजनेचे पैसे मिळणे मुश्किल आहे, अशा स्थितीत 17 ऑगस्टपर्यंत जास्तीत जास्त लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडून घेण्याचे आदेश प्रशासनाला महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहेत. त्याचबरोबर महिलांनी आपल्या बँक खात्याशी आधारकार्ड जोडलं आहे का? ते पाहण्याचे आवाहनही केले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत 1 कोटी 35 लाभार्थ्यांची यादी तयार झाली आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांना थेट बँक खात्यात डिबिटीद्वारे लाभ जमा करण्यात येणार आहेत. परंतु, पात्र झालेल्या लाभार्थ्यांपैकी सुमारे 27 लाख लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेलेले नाहीत. या लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्याची विशेष मोहिम प्रत्येक जिल्ह्यात राबवण्याचे आदेश आदिती तटकरे यांनी दिले आहेत. तसंच, कोणताही लाभार्थी योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता प्रशासनाने घ्यावी. त्यासाठी जिल्हास्तरीय बँकर्सची मदत घेण्यात यावी. येत्या 17 ऑगस्टपर्यंत जास्तीत जास्त लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडून घ्यावेत, अशा सूचना तटकरे यांनी दिल्या आहेत.दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी 31 ऑगस्ट़पर्यंतची मुदत ही अंतिम नसून अर्जाची प्रक्रिया निरंतर चालणार आहे. 31 ऑगस्ट़नंतर आलेल्या पात्र लाभार्थ्यानाही या योजनेचा लाभ मिळणार आहे, असंही त्यांनी पुढे स्पष्ट केलं. दुसरीकडे बीड जिल्ह्यातही हजारो महिलांचे बँक खात्याशी आधारकार्ड लींक नसल्याचे सांगण्यात येते. 17 ऑगस्टपर्यंत बँक खात्याशी आधार क्रमांक जोडून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.